वृत्तसंस्था/ अलूर
बुधवार 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाकरिता सराव प्रशिक्षण शिबिर कर्नाटकातील अलूर येथे आयोजित केले होते. या शिबिराचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतने या शिबिराला भेट दिली.
ऋषभ पंत हा वाहन अपघातात जायबंदी झाला होता. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. दुखापत झालेल्या पायावर डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. या दुखापतीवर वैद्यकीय इलाज सध्या चालू असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने तज्ञ डॉक्टर्स त्याच्यावर इलाज करीत आहेत. या भेटीने पंतने मैदानावर प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर यांची भेट घेऊन काही वेळ चर्चा केली.

भारतीय संघ मंगळवारी लंकेला रवाना झाला. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर 2 सप्टेंबरला पल्लिकेली येथे होणार आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज केएल राहुल या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात खेळू शकणार नाही. भारताचा स्पर्धेतील दुसरा सामना 4 सप्टेंबर रोजी नेपाळबरोबर होणार आहे. मात्र या स्पर्धेच्या सुपर 4 फेरीमध्ये केएल राहुल खेळणार असल्याचे सांगण्यात आले.









