वृत्तसंस्था/ कोलकाता
भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज रिषभ पंत आगामी आयपीएल हंगामात आपले पुनरागमन करेल, असा विश्वास दिल्ली कॅपिटल्स संघाचे संचालक तसेच माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात रिषभ पंतला वाहन दुर्घटनेमध्ये गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या मोटारीने डिव्हाईडरला धडक दिल्याने त्या मोटारीने तातडीने पेट घेतला. पंतला कसेबसे मोटारीतून बाहेर काढण्यात आले होते पण त्याला अनेक जखमा तसेच पायालाही गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या दुर्घटनेनंतर तब्बल 40 दिवसांनी तो पुन्हा आपल्या पायावर आधार घेऊन उभारू शकला. अलीकडेच दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सराव शिबिर सुरू झाले असून या शिबिरात ऋषभ पंत दाखल झाला होता. पंतने आपला शेवटचा कसोटी सामना गेल्या डिसेंबरमध्ये बांगलादेशबरोबर मीरपूर येथे खेळला होता.









