पक्ष महासचिव पलानिस्वामी यांची स्पष्टोक्ती
वृत्तसंस्था/तूतिकोरिन
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकचे महासचिव एडप्पादी के. पलानिस्वामी यांनी पक्षातून निलंबित नेते ओ. पन्नीरसेल्वम यांची वापसी शक्य नसल्याचे स्पष्ट केले. पक्ष मुख्यालयावर हल्ला करणाऱ्या ‘गुंडांच्या टोळीचे’ त्यांनी नेतृत्व केले होते. यामुळे पक्षसंघटनेत स्थान मिळविण्यास ते आता पात्र राहिले नाहीत असे पलानिस्वामी यांनी गुरुवारी म्हटले आहे.
तूतिकोरिन येथे पत्रकारांनी पन्नीरसेल्वम यांच्या अण्णाद्रमुकमधील वापसीच्या शक्यतेबद्दल यांनी प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना हे शक्य नसल्याची भूमिका मांडली. एकदा दुरावा निर्माण झाला की कायमस्वरुपी दुरावा, असे म्हणत पलानिस्वामी यांनी पन्नीरसेल्वम यांना पक्षात पुन्हा स्थान मिळणार नसल्याचे म्हटले आहे.
पन्नीरसेल्वम आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून पक्ष शत्रूंच्या हाती सोपविण्याचे कृत्य आम्ही सहन करू शकत नाही. पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वात समाजकंटकांनी 2022 मध्ये चेन्नईत पक्ष मुख्यालयावर हल्ला केला, हे पक्ष कार्यालय अण्णाद्रमुक कार्यकर्त्यांसाठी एक मंदिर आहे. पन्नीरसेल्वम आता अण्णाद्रमुकमध्ये सामील होण्याच्या योग्यतेचे राहिले नाहीत. याचमुळे त्यांना पक्षात पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही असे पलानिस्वामी म्हणाले.
2022 मध्ये हकालपट्टी
2021 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरून पलानिस्वामी आणि पन्नीरसेल्वम यांच्यात राजकीय संघर्ष झाला. तर या संघर्षात वरचढ चढत पलानिस्वामी यांनी पक्षावर पूर्ण नियंत्रण मिळविले होते. अण्णाद्रमुकच्या निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च संस्थेने जुलै 2022 मध्ये पन्नीरसेल्वम आणि त्यांच्या समर्थकांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
गृहमंत्र्यांसमोर राज्याचे मुद्दे उपस्थित
नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीसंबंधी पलानिस्वामी यांना पत्रकारांना प्रश्न विचारले. तामिळनाडूशी संबंधित मुद्दे म्हणजेच मनरेगा अंतर्गत प्रलंबित केंद्रीय निधी जारी करण्याची आवश्यकता शाह यांच्यासमोर व्यक्त केली. तसेच दोन भाषा धोरणाचा मुद्दा मांडला, द्रविड नेते सी.एन.अण्णादुराई आणि एम.जी. रामचंद्रन तसेच जे. जयललिता यांच्या काळापासून पक्षाची यासंबंधी एक भूमिका राहिली आहे. तामिळनाडूत दोन भाषा धोरण जारी रहायला हवे अशी भूमिका मांडल्याचा दावा पलानिस्वामी यांनी केला.









