पक्षाचे महासचिव पलानिस्वामी यांनी दिले संकेत
वृत्तसंस्था/ चेन्नई
अण्णाद्रमुकचे महासचिव एडप्पादी के. पलानिस्वामी यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नेते ओ. पन्नीरसेल्वम यांना पुन्हा पक्षात घेतले जाणार नसल्याचे रविवारी सांगितले आहे. तर आपण पक्षात परतण्यासाठी तयार असल्याचे वक्तव्य पन्नीरसेल्वम यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची 77 वी जयंती आज साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पलानिस्वामी यांनी पत्र कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. यात एक लांडगा अन् बकरी एकत्र राहू शकते का? टोळधाड अन् पिक एकत्र राहू शकते का? निष्ठावंत अन् पक्षाला दगा देणारा खांद्याला खांदा लावून उभे राहू शकतात असे प्रश्न पलानिस्वामी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून विचारले आहेत.
विनाअट पक्षात सामील होण्याची तयारी
अण्णाद्रमुकमध्ये परतण्यासाठी मी तयार आहे, परंतु महासचिव पद कार्यकर्त्यांकडून निवडले जावे. टीटीव्ही दिनाकरन आणि शशिकला यांच्यासोबत पक्षात विनाअट सामील होण्यास तयार आहे. आम्ही चर्चेद्वारे मुद्दे निकाली काढू शकतो असे पन्नीरसेल्वम यांनी म्हटले होते. पन्नीरसेल्वम हे आता एडीएमके वर्कर्स राइट्स रिट्रीवल कमिटीचे प्रमुख आहेत.
स्टॅलिन सरकार लक्ष्य
पलानिस्वामी यांनी महिला सुरक्षेसमवेत अनेक मुद्द्यांवर एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारवर निशाणा साधला आहे. लोक राज्यातील सरकारवर नाराज आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर अण्णाद्रमुक पुन्हा सत्तेवर यावा अशी लोकांची इच्छा असल्याचे पलानिस्वामी यांनी पत्रात म्हटल आहे.
जयललितांबद्दल गौरवोद्गार
आव्हाने असतानाही प्रभावी सरकार चालविण्याची कामगिरी जयललिता यांनी करून दाखविली होती. जयललिता यांनी 2011 मध्ये अण्णाद्रमुकला मोठ्या बहुमताने विजय मिळवून दिला आणि 2016 मध्येही सत्तेवर राहिल्या. डिसेंबर 2016 पर्यंत स्वत:च्या मृत्यूपर्यंत सरकारचे त्यांनी नेतृत्व केले. अण्णाद्रमुक 2011-2021 पर्यंत 10 वर्षे सत्तेवर राहिला, तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात ही एक मोठी कामगिरी असल्याचे पलानिस्वामी यांनी म्हटले आहे.









