नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) माजी डीजी पंकज कुमार सिंह यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार (डिप्युटी एनएसए) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश मंगळवारी सरकारने जारी केला आहे. बीएसएफमधील कार्यकाळ 31 डिसेंबर 2022 रोजी संपल्यानंतर ते निवृत्त झाले होते. त्यानंतर केवळ पंधरवडय़ात त्यांच्या नव्या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पंकज कुमार सिंह हे राजस्थान केडरचे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची करारावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे वडील प्रकाश सिंह 1959 बॅचचे निवृत्त आयपीएस अधिकारी, जून 1993 ते जानेवारी 1994 पर्यंत बीएसएफचे प्रमुख होते. प्रकाश सिंह यांना देशातील पोलीस सुधारणांचे शिल्पकार मानले जातात.









