पुलाची शिरोली/वार्ताहर
Kolhapur News : चोरी,मारामारी व अन्य गैर प्रकारांना आळा बसण्यासाठी उद्योजक,व्यावसायिक व ग्रामपंचायती आदींनी सी.सी.टिव्ही कँमेरे बसवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे नुतन सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी केले.ते पत्रकार व पोलीस यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातंर्गत बारा गावांचा समावेश आहे.यापैकी शिरोली,नागाव,शिये,टोप संभापूर व औद्योगिक वसाहत हा अतिसंवेदनशिल भाग आहे. या ठिकाणी नामांकीत उद्योग,मार्बल लाईन,पेट्रोल पंप,हाँटेल्स,गोडावून,ट्रान्सपोर्ट मोठ्या प्रमाणात आहेत.पण याभागांचा सर्वे केला असता किरकोळ प्रमाण वगळता कोठेही सुरक्षा रक्षक ,सी.सी.टिव्ही कँमेरे,सुरक्षित कंपाउंन्ड ,फायर स्टेशन ,पुरेशी लाईटची व्यवस्था पहावयास मिळाली नाही.त्यामुळे या भागात घडणाऱ्या लहान मोठ्या चोरीच्या घटना,दोन गटात होणाऱ्या मारामारी,औद्योगिक वसाहतीमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना तत्काळ उघडकीस आणणे पोलिसांना कठीण बनत आहे.
अशा घटना टाळण्यासाठी व घडलेल्या घटना उघडकीस आणणे व संशयित आरोपींना अटक करण्यास पोलिसांना मदत व्हावी.याकरिता उद्योजक,व्यावसायिक व ग्रामपंचायत यांनी आपापल्या भागात व वर्दळीच्या ठिकाणी सी.सी.टिव्ही कँमेरे बसवावेत असे आवाहन गिरी यांनी केले आहे.याबाबत स्मँक असोसिएशन,लोक प्रतिनिधी,उद्योजक,व्यावसायिक यांना सुचना देण्यात येणार असल्याचे तसेच एखाद्या ठिकाणी अवैद्य घटना घडत असल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असेही त्यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.
तसेच सध्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.यामुळे शिरोली,शिये व हालोंडी या गावांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या व उपाय तसेच महामार्गावरील वाहतूक व्यवस्था,आपत्ती व्यवस्थापण आदी बाबींवर सविस्तर आढावा व चर्चा करण्यात आली. यावेळी फौजदार विठ्ठल घोगरे,निलेश कांबळे,सुरेश पाटील,अभिजीत कुलकर्णी,नंदकुमार साळोखे,सतिश पाटील,सुनिल सुर्यवंशी,दिपक ऐतवडे,कुबेर हंकारे, युवराज पाटील,रत्नशेखर उपाध्ये,महेश आंबी आदी उपस्थित होते.