वृत्तसंस्था/ दोहा
भारताचा चॅम्पियन बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणीने आयबीएसएफ विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावताना अंतिम लढतीत त्याने आपल्याच देशाच्या सौरव कोठारीचा पराभव केला. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकण्याची अडवाणीची ही 26 वी वेळ आहे.
पहिल्या तासाच्या खेळात 26-180 असे पिछाडीवर पडल्यानंतरही अडवाणीने 2018 चा चॅम्पियन कोठारीचा 1000-416 असा पराभव करीत जेतेपद पटकावले. गेल्या वर्षीही कौलालंपूर येथे झालेल्या अंतिम फेरीत या दोघांत लढत झाली होती. अंतिम लढतीत कोठारीने प्रारंभी आघाडी घेत चांगली सुरुवात केली होती. पण दोनदा सोप्या संधी गमविल्यानंतर अडवाणीला पिछाडी भरून काढण्याची संधी मिळाली. यानंतर दोघांकडूनही सारखाच खेळ झाला. अडवाणीने दोनदा 150 हून अधिक गुणांचे ब्रेक्स मिळविल्यानंतर आघाडी घेतली. कोठारीला मात्र त्याला मिळालेल्या संधीचा लाभ उठवता आला नाही.
अडवाणीने 214 गुणांचा सामन्यातील सर्वोच्च ब्रेक घेतल्यानंतर तो सुसाट सुटला. त्याने बराच काळ 250 गुणांची आघाडी राखली होती. कोठारीने 99 गुणांचा ब्रेक मिळविल्यानंतर ही आघाडी 150 गुणांवर आली. अडवाणीने वेग वाढवत ही आघाडी वाढवत नेली आणि 199 गुणांचा अभेद्य ब्रेक नोंदवत 1000 गुणांचा टप्पा गाठत जेतेपद साजरे केले.
अडवाणी आता लगेचच होणाऱ्या वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप शॉर्ट फॉरमॅटमध्ये भाग घेणार आहे. कोठारीने उपांत्य फेरीत ध्रुव सितवाला यास चुरशीच्या लढतीत 900-756 गुणांनी हरवून अंतिम फेरी गाठली होती. अडवाणीने रुपेश शहाचा 900-273 असा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. अडवाणीने वर्ल्ड चॅम्पियनशिप 2003 मध्ये पहिल्यांदा पटकावली होती. बिलियर्ड्स व स्नूकरमधील सर्व प्रकारच्या फॉरमॅटमध्ये वर्ल्ड टायटल्स जिंकणारा अडवाणी हा एकमेव खेळाडू आहे. लाँग फॉरमॅटमध्ये त्याने 9 वेळा तर पॉईंट फॉरमॅटमध्ये 8 वेळा त्याने विश्व जेतेपद मिळविले आहे. याशिवाय वर्ल्ड सांघिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धाही त्याने एकदा जिंकली आहे.









