वृत्तसंस्था/ डोहा
आयबीएसएफतर्फे येथे घेण्यात आलेल्या विश्व बिलियर्डस चॅम्पियनशिप स्पर्धेत पॉईंट फॉर्मेंट प्रकारात भारताचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बिलियर्डसपटू पंकज अडवाणीने जेतेपद पटकाविले.
अंतिम लढतीत पंकज अडवाणीने भारताच्या सौरभ कोठारीचा 5-0 अशा फ्रेम्समध्ये पराभव केला. 38 वर्षीय पंकजने अलिकडेच 1000 गुणांच्या लाँगर फॉर्मेंटचे विश्वविजेतेपद मिळविले होते. आता त्याने पॉईंट फॉर्मेंट प्रकाराचे अजिंक्यपद मिळवून दुहेरी मुकुट साधला. पंकज अडवाणीने 2005, 2008, 2014, 2018 साली 1000 पॉईंट फॉर्मेंट स्पर्धा जिंकल्या असून त्याने 2015 साली स्नूकरचे विश्वविजेतेपद मिळविले होते. बिलियर्डच्या शॉर्ट फॉर्मेंटमध्ये एकूण 9 फ्रेम्सची लढत घेतली जाते आणि प्रत्येक फ्रेममध्ये 150 गुणांची मर्यादा असते. कोठारी विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या फ्रेममध्ये सौरभने दमदार सुरूवात केली. पण पंकजने 144 गुणांचा शतकी ब्रेक नोंदवित सौरभवर 1-0 अशी आघाडी मिळविली. त्यानंतर पुढील दोन फ्रेम्समध्ये पंकज अडवाणीने 2 शतकी ब्रेक्स नोंदवून कोठारीवर 3-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. अडवाणीने शेवटच्या दोन फ्रेम्समध्ये अनुक्रमे 81 आणि 77 गुणांचे ब्रेक नोंदवित कोठारीचे आव्हान 5-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले. अडवाणी आता चेन्नईत होणाऱ्या राष्ट्रीय बिलियर्डस आणि स्नूकर स्पर्धेत सहभागी होत आहे.









