नेपाळमध्ये होते केंद्र : लोकांनी घराबाहेर घेतली धाव : दिल्ली-एनसीआर, उत्तरप्रदेश, उत्तराखंडमध्ये जाणवला भूकंप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली-एनसीआर समवेत उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये मंगळवारी तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी होती. मंगळवारी दुपारी 2 वाजून 53 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये होते आणि ते जमिनीत 5 किलोमीटर खोलवर होते. नेपाळमध्ये भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाल्याचे समजते.
पश्चिम नेपाळमध्ये या भूकंपाचे केंद्र होते. हा भाग उत्तराखंडला लागून असल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक संजय कुमार प्रजापति यांनी सांगितले आहे. दिल्ली-एनसीआर, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान समवेत मध्यप्रदेशच्या काही हिस्स्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली भूकंपाच्या दृष्टीकोनातून अत्यंत संवेदनशील झोन-5 मध्ये सामील आहे.
भूकंपादरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया हे देखील निर्माण भवनातील स्वत:च्या कार्यालयातून बाहेर पडले. दिल्लीत देखील भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत, सर्वजण सुरक्षित असतील अशी आशा असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
नेपाळमध्ये जाणवले तीन धक्के
नेपाळमध्ये तीन वेगवेगळ्या वेळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. नेपाळमध्ये भूकंपाचा पहिला धक्का 4.6 तीव्रतेचा दुपारी 2.25 वाजता जाणवला. दुसरा धक्का 6.2 तीव्रतेचा होता आणि तो दुपारी 2.51 वाजता जाणवला होता. तर भूकंपाचा तिसरा धक्का दुपारी 3.06 वाजता जाणवला आणि तो 3.6 तीव्रतेचा होता.
पाकिस्तानात भीती
नेदरलँडचे वैज्ञानिक फ्रँक हूगरबीट्स यांनी सोमवारीच पाकिस्तानात भूकंप होऊ शकतो, परंतु भारतात धक्के जाणवू शकतात अशी भविष्यवाणी केली होती. हुगरबीट्स यांनीच चालू वर्षाच्या प्रारंभी तुर्किये आणि सीरियात विध्वंसक भूकंप होण्याचा इशारा दिला होता. फ्रँक हे सोलर सिस्टीम जियोमेट्री सर्व्हे नावाच्या संस्थेत संशोधक आहेत. पाकिस्तान आणि त्याच्या आसपासच्या भागात मोठा भूकंप होऊ शकतो, पाकिस्तानवरील वायुमंडळात बदल दिसून येत असल्याने भूकंप होण्याची शक्यता असल्याचे फ्रँक यांनी म्हटले होते. फ्रँक यांनी यापूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याने आता पाकिस्तानातील लोक भीती व्यक्त करत आहेत.









