४ ते ७ मार्च विविध कार्यक्रमांचे आयोजन, ६ मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १३ डी थिएटरचे लोकार्पण : ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन, लघुपटासह गीतांचा कार्यक्रम
कोल्हापूर
संस्कृती, इतिहास आणि पर्यटनाचा विकास या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत व जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने ४ ते ७ मार्च दरम्यान किल्ले पन्हाळगडावर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांसह ऐतिहासिक वस्तुंचे प्रदर्शन, पन्हाळगडाचा रणसंग्रमाम लघुपट अनावरण, गीतांचा कार्यक्रम, निमंत्रित चित्रकार व शिल्पकारांची प्रात्यक्षिके, रील्स, व्हिडिओ व फोटोग्राफी स्पर्धांचे आयोजन केले असल्याची माहिती पन्हाळा नगरपरिषदेचे प्रशासक चेतनकुमार माळी यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 6 मार्च रोजी पन्हाळा किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या १३ डी थिएटरचे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण होणार आहे.
इंटरप्रीटेशन सेंटर पन्हाळा येथे आज, ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता पन्हाळा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन व ऐतिहासिक वस्तुंच्या प्रदर्शनाला सुरूवात होणार आहे. ५ मार्च रोजी पन्हाळगडावर सायंकाळी ४ वाजता शिवतीर्थ उद्यानासेमोर विद्यार्थी कलाकरांच्या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील जाज्वल्य आणि प्रेरणादायी प्रसंगांवर आधारीत ऐतिहासिक नृत्य-नाट्या व शिवजन्म ते शिवराज्यभिषेक सोहळा सादर केला जाणार आहे. तर त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता संस्कार प्रस्तुत जीवनगाणे या कार्यक्रमात झी सारेगम विजेता प्रसेनजीत कोसंबी व झी सारेगम फेम स्वरदा गोडबोले यांचा मराठी व हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ६ मार्च रोजी इंटरप्रीटेशन सेंटर पन्हाळा येथे सायंकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण व १३ डी थिएटरचे लोकार्पण व जनसंवाद कार्यक्रम होणार आहे. ७ मार्च रोजी निमंत्रित चित्रकार, शिल्पकार यांची प्रात्यक्षिके सकाळी ९ वाजलेपासून पन्हाळा येथील अंबरखाना परिसरात आयोजित करण्यात आली आहेत. ७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता कोल्हापूर जिह्यातील गडकिल्ले या विषयावर इंस्टाग्राम रील्स, यु ट्युब व्हिडीओ व फोटोग्राफी स्पर्धा व पारितोषिक वितरण इंटरप्रीटेशन सेंटर पन्हाळा येथे होणार आहे.
१३ डी थिएटरमधून ऐतिहासिक घटनांचे होणार सादरीकरण
पन्हाळा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपावन स्पर्शाने पुनीत झालेले पर्यटनस्थळ व तालुक्याचे मुख्यालय असल्याने दरवर्षी २० ते २५ लाख पर्यटक, इतिहासप्रेमी, शिवप्रेमी भेट देतात. या ठिकाणाचे महत्त्व लक्षात घेऊन या ठिकाणी पर्यटकांसाठी स्टेरीओस्कोपीक १३ डी थिएटर या कामाचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या अत्याधुनिक अशा १३ डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऐतिहासिक कलाकृती पाहता येणार आहे. ६ मार्च रोजी पन्हाळ्याचा रणसंग्राम हा लघुपट व १३ डी थिएटरचा लोकर्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजना व वैशिष्ट्यापूर्ण योजनेंतर्गत त्या ठिकाणी लाईट शो उभारणे, साऊंड शो उभारणे, लेजर शो तसेच इंटरप्रीटेशन सेंटर इमारतीचे काम व परिसराचे सुशोभिकरण करणे इत्यादी कामे करण्यात आली आहेत.








