वारणानगर, प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यात गेल्या चार दिवसापासून पावसाची संततधार सुरु असून, चोवीस तासात ३३ मि.मि.पावसाची नोंद झाली आहे. आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रना कार्यरत व सतर्क झाल्याचे शशिकांत सातपुते यांनी सांगीतले.चार दिवस संततधार सुरु असलेल्या पाऊसाचा काल दिवसभर थोडा जोर ओसरला होता. मात्र पुन्हा रात्री पासून संततधार सुरु झाली.पन्हाळा पश्चिम मधील कुंभी-कासारी व जांभळी-धामणी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.
कासारी नदीवरील यवलुज-पोर्ले,वाळोली,पुनाळ-तिरपण,पिसात्री,आळवे,बाजारभोगाव बर्की,बंधारे पाण्याखाली गेले आहेत.तालुक्यात नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. पन्हाळा पश्चिम भागातील कासारी पन्हाळा पूर्व भागातील वारणा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडल्याने नदी काटच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.वारणा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
गेले चार दिवस कोसळत असलेल्या पाऊसाने तालुक्यात ठीक ठिकाणी घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या आहेत.माळवाडी येथील प्रकाश चंद्रकांत खापणे यांची राहत्या घराची मध्यरात्री भिंत कोसळली.चाळीस हजाराचे नुकसान झाले.तसेच पिंपळे तर्फ ठाणे येथील दगडू ज्ञानू पाटील यांच्या घराची भिंत कोसळून मोठे पन्नास हजाराचे नुकसान झाले.पणूत्रे येथील बळवंत केरबा पाटील,आकुर्डे येथील दस्तगीर गुलाब फकीर,भाचरवाडी येथील मालुबाई ज्ञानू रेडेकर या तिघांच्या घराची पडझड होऊन ८५ हजार रु. नुकसान झाले.
चांदोली धरण ६३ टक्के भरले
वारणा खोऱ्याची जीवनदायीनी असलेल्या वारणा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले आहे. वारणा नदीचा मुख्य पाणीसाठा होणारे वसंत सागर या चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आजवर ७०० मि.मी.पाऊसाची नोंद झाली. पाणलोट क्षेत्रात १३१०६ क्युसेसने पाण्याची आवक झाल्याने धरणात २१.९९ टीएमसी पाणीसाठा होऊन धरण ६३.९२ टक्के भरले आहे. नदी पात्रात ८८५ क्यूसेसने विज निर्मीतीसाठी विसर्ग सुरु असल्याचे पाटबंधारे कोडोली विभागाचे सहा.अभियता मिलींद किटवाडकर यांनी सांगीतले.
तहसिलदार माधवी शिदे यांची पूरस्थितीची पाहणी : यंत्रणा सतर्क
मुसळधार पाऊसाने झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांनी संभाव्य पूरस्थितीच्या भागात जाऊन पाहणी केली. यावेळी आपत्ती कालीन उपाय योजना व्यवस्था सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी पूरक्षेत्र ग्रामपंचयतींना भेटी देऊन ग्रामसेवकांना पूरस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज राहावे आशा सूचना दिल्या आहेत.