आरक्षण जाहीर झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
By : दिलीप पाटील
वारणानगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक तयारीला लागले आहेत. अजून आरक्षण सोडत जाहीर झालेली नाही. त्यामुळे या सोडतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सर्वच इच्छुकांनी सावध पवित्रा घेत मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादीत उभी फूट पडण्यापूर्वी पन्हाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस–शिवसेना यांच्यात सख्य होते. भाजपची तालुक्यात ताकद नगन्य असलीतरी पन्हाळा पश्चिम भागातील भाजपचे नेते के. एस. चौगले यांनी यवलूज मतदारसंघाचे कायम प्रतिनिधित्व केले आहे. गतवेळच्या सभागृहात त्यांच्या पत्नी कल्पना चौगले यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
कळे मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके यांचा प्रभाव कायम आहे. या ठिकाणी नरके यांचे खंदे समर्थक सर्जेराव पाटील यांनी गत सभागृहात प्रतिनिधित्व केले आहे. पोर्ले मतदारसंघात जनसुराज्य विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कायम काटाजोड लढत होते. या मतदारसंघात गतवेळी चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या प्रियांका पाटील यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे शंकर पाटील कोतोली, शिवाजीराव मोरे सातवे, विशांत महापुरे कोडोली यांनी गतवेळी प्रतिनिधित्व केले आहे. पन्हाळा तालुक्यात आमदार डॉ. विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सत्यजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या नेतृत्वात लढती व्हायच्या. राष्ट्रवादी, शिवसेना स्थानिक गटात समन्वय साधून जनसुराज्य पक्षाच्या विरोधात तोडीस तोड निवडणुका झाल्या आहेत.
उमेदवार कोण यावर देखील गावागावातील राजकीय समीकरणे बदलत असायची. अनेक पंचायत समिती पातळीवर प्रभावी गट आहेत. जिल्हा परिषद उमेदवारीच्या जोडीला पंचायत समितीला कोण उमेदवार असतात यावर देखील जिल्हा परिषद मतदारसंघातील निकाल बदलतात याची जाणीव ठेवून प्रत्येक पक्षाला उमेदवारी निश्चित करावी लागते.
जनसुराज्यचे आमदार डॉ. विनय कोरे, शिंदे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या सोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यांची महायुती आहे. या निवडणुका महायुती म्हणून लढवू शकत असतील तर चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.
यांच्या विरोधात शिवसेना उबाठाचे माजी आमदार सत्यजीत पाटील, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसच्या सोबत असणारे इंडिया आघाडीचे घटक पक्ष यांची तसेच मनसे, वंचित बहुजन आघाडीसह इतर छोटे पक्ष कोणाला उमेदवारी देणार, स्थानिक पातळीवर आघाड्या कशा पद्धतीने होणार यावर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढतीचे चित्र अवलंबून आहे. सध्या तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता स्थानिक आघाड्यांवर प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.








