प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Market Committee News : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरवात होणार आहे. समितीवर वर्चस्व असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी, जनसुराज्य पक्षाने बुधवारी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांना सोबत घेत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीची स्थापन करत पॅनेलची घोषणा केली. यामध्ये 15 उमेदवारांची नावेही जाहीर केली. तर दूसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) भाजप, नरके गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप आणि आम आदमी पार्टी आदींचे दूसरे पॅनेल होण्याची शक्यता आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून बाजार समितीची निवडणुक बिनविरोध करण्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला असून निवडणुक दूरंगी होण्याची शक्यता आहे.
बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आज गुरुवार 20 रोजी अंतिम दिवस असणार आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून निवडणुक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांच्या हालचाली सुरु होत्या. मात्र यामध्ये जागा वाटपवर नेत्यांचे एकमत न झाल्याने निवडणुक बिनविरोध करण्यात अपयश आले. दरम्यान आमदार हसन मुश्रीफ, विनय कोरे, सतेज पाटील, पी. एन. पाटील, प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, मानसिंगराव गायकवाड आदी नेत्यांनी एकत्र येत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीची स्थापना केली.तसेच पॅनेलमधील 15 उमेदवारही जाहीर केले. तर अडते-व्यापारी गटातील दोन आणि हमाल तोलाईदार गटातील एक अशा तीन उमेदवारांची नावे आज जाहीर करण्यात येणार आहेत.
ठाकरे गटाला बाहेरचा रस्ता
काँग्रेस-राष्ट्रवादीने बाजार समितीमध्ये पॅनेल करताना ठाकरे गटाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ठाकरे गट महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहणार होता. मात्र जागा वाटपावर एकमत न झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने ठाकरे गटाला सोबत घेतलेले नाही. तर शिवसेनेतील खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांना सोबत घेत पॅनेल केले आहे. ठाकरे गटातील संजबाबा घाटगे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत असले तरी अन्य पदाधिकारी या पॅनलच्या विरोधात असणार आहेत.
दूसऱ्या बाजूला संमिश्र पॅनेल
कोल्हापूर बाजर समितीसाठी काँग्रेस,राष्ट्रवादी,जनसुराज्य पक्षाने पॅनेल जाहीर केल्यानंतर भाजप,शिवसेना (ठाकरे गट),माजी आमदार चंद्रदीप नरके,सत्यजित पाटील,शेतकरी कामगार पक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना,आम आदमी पार्टी आदी पक्षांची मोट बांधण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे दुसऱ्या बाजूर संमिश्र पॅनेल होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीवर जिल्हा बँकेचा प्रभाव
बाजार समितीच्या निवडणुकीवर जिल्हा बँकेच्या राजकारणाचा प्रभाव दिसत आहे.जिल्हा बँकेत संचालक असणाऱ्या नेत्यांनी एकत्रित येत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीची स्थापना केली आहे. बँकेचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून हे पॅनेल केल्याची चर्चा आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्यमध्येही नाराजी
काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य पक्षाने उमेदवारी जाहीर केले असले तरी या तीनही पक्षांमधील काही कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते दूसऱ्या पॅनेलसोबत जाण्याची शक्यता आहे. जनसुराज्य, काँग्रेस, राष्ट्रवादीमधील काही नाराज आमच्या सोबत येणार असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.
पॅनेलसाठी ठाकरे गटाचा पुढाकार
काँग्रेस राष्ट्रवादीने डावलल्यानंतर ठाकरे गटाचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी उपनेते अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी पॅनेलची घोषणा करणार असल्याचे जाहीर केले. यानंतर ठाकरे गटातीलच पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पॅनेलसाठी अन्य पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य विरोधात दूसरे पॅनेल करण्यामध्ये ठाकरे गटाचा पुढाकार दिसून येत आहे.
शासकीय विश्रामगृह येथे आज पॅनेलची घोषणा
काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्यच्या विरोधात होणाऱ्या दूसऱ्या पॅनेलची घोषणा आज गुरुवार 20 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे होणार आहे. ठाकरे गटाचे उपनेते अरुण दुधवडकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार संपतबापू पवार-पाटील आदी नेते याठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी, जनसुराज्यचे वर्चस्व
बुधवारी उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षाचे वर्चस्व दिसून आले आहे. पॅनेलमध्ये राष्ट्रवादीला सहा तर जनसुराज्य पक्षाला चार जाग मिळाल्या आहेत. तसेच काँग्रेसला तीन, शिवसेनेला दोन आणि ठाकरे गटाचे संजयबाबा घाटगे यांना एक जागा देण्यात आली आहे.
राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार पुढील प्रमाणे :
विकास सेवा संस्था गट
सर्वसाधारण गट : भरत बाबासो पाटील-भुयेकर, भुयेवाडी, संभाजी आकाराम पाटील कुडीत्रे, शेखर शंकरराव देसाई सोनाळी, सूर्यकांत रघुनाथ पाटील बाचणी, प्रकाश पांडूरंग देसाई देसाईवाडी पन्हाळा, राजाराम तुकाराम चव्हाण येळवण जुगाई शाहूवाडी, बाळासाहेब गणपती पाटील वंदूर कागल.
महिला प्रतिनिधी : सोनाली शरद पाटील अर्जुनवाडा राधानगरी, मेघा राजेंद्र देसाई पुष्पनगर भुदरगड,
इतर मागास वर्ग : शंकर दादासो पाटील शिवारे शाहूवाडी,
भटके विमुक्त : संदीप कृष्णा वरंडेकर रा. दासेवाडी भुदरगड
ग्रामपंचायत सदस्य गट :
सर्वसाधारण खुला : शिवाजी महादेव पाटील कसबा तारळे राधानगरी, सुयोग सुभाष वाडकर खेबवडे करवीर,
आर्थिकदृष्ट्या दुर्बल : पांडुरंग गणपती काशीद यवलूज पन्हाळा,
अनुसुचित जाती जमाती : नाना धर्माजी कांबळे साके कागल
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









