मडगाव : संगीत क्षेत्रात विशेषत: नाट्यागीत प्रांतात आपल्या गोड पहाडी आवाजाने एक विशेष ओळख करुन ठेवलेले पं. प्रभाकर कारेकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी शिवाजी पार्क दादर येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पं. प्रभाकर कारेकर यांच्या दोन्ही मुलांनी मिनेश व अमित यांनी पार्थिवाला अग्नी दिला.यावेळी संगीत क्षेत्रातील पं. सतिश व्यास, पं. वेणु मुजुमदार, मुकूंदराज देव, आदित्य कल्याणपूर, अश्विनी भिडे, सुरेश बापट, नितीन शंकर, डॉ. अजित रानडे, सशांक कट्टी, श्रृती काटकर सदवलीकर तसेच निकटचे नातेवाईक शेखर कारेकर, राजेंद्र कारेकर, तेज कारेकर, श्रृतेश वाळके यांची उपस्थिती होती. 4 जुलै 1944 रोजी म्हापसा येथे जन्मलेले पं. प्रभाकर कारेकर यांनी सुमारे 40 वर्षे संगीत क्षेत्रात आपले योगदान देऊन प्रेक्षकांकडून दाद मिळवली. अनेक पुरस्काराने सन्मानित केलेल्या पं. प्रभाकर कारेकर यांनी अनेक शिष्यांनाही तयार केले होते.
संगीतप्रेमींमध्ये तीव्र दु:खाची लाट
प्रख्यात गायक आणि संगीतकार पंडित प्रभाकर कारेकर यांच्या निधनाने गोव्यातील संगीतप्रेमी आणि त्यांच्या हजारो चाहत्यांमध्ये तीव्र दु:खाची लाट पसरली आहे. आज पणजीत तातडीने श्रद्धांजली सभेचे आयोजन केले असून त्या ठिकाणी पंडितजींच्या चाहत्यांनी श्रद्धांजली देण्याचे ठरविले आहे.पंडित प्रभाकर कारेकर हे जरी मुंबईत राहत असले तरी त्यांची नाळ गोव्याशी जुळली होती. त्यांचा नाट्यासंगीतावर जास्त मोठा पगडा होता. अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने ते वारंवार गोव्यात येत असत. गेल्यावर्षी गोवा सरकारतर्फे त्यांना सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी ते सपत्नीक गोव्यात आले होते. अलीकडे त्यांचा आजार बराच वाढलेला होता. त्यामुळे त्यांना मुंबईत त्यांच्या नातेवाईकांनी एका इस्पितळात दाखल केले होते आणि बुधवारी रात्री दहाच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.
महाराष्ट्र गोव्याच्या गळ्याने गातो, असे त्यावेळी पु . ल. देशपांडे यांनी म्हटले होते. गोव्याने अनेक मोठमोठे कलाकार दिले. त्यात लता मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर तसेच किशोरी आमोणकर, पंडित प्रभाकर कारेकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित रामदास कामत अशी अनेक मोठमोठ्या मंडळीनी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात आपले नाव आपल्या कलेने अजरामर केले. त्यातून गोव्याच्या नावाचा देखील सर्वत्र उल्लेख होत असे.पंडित प्रभाकर कारेकर हे मोकळ्या स्वभावाचे होते आणि सर्वांशी मिळून मिसळून वाटत होते आपल्या कुलदेवतेच्या माशेल येथील मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी त्यांनी कला अकादमीमध्ये काही वर्षांपूर्वी सुरेश वाडकर यांच्याबरोबर मैफिलीचे आयोजन केले होते आणि त्यातून जे उत्पन्न तयार झाले तो सारा पैसा त्यांनी मंदिराला प्रदान केला होता.
कारेकरांनी आपल्या जादुई आवाजातून नाट्यासंगीत क्षेत्रातला जान आणली. गोव्यात आयोजित अनेक संगीत संमेलनात त्यांनी आपली कला पेश केली होती आणि त्यांचे वागणे अत्यंत मित्रत्वाच्या पद्धतीचे होते त्यामुळेच त्यांनी आपल्या आवाजाबरोबरच आपल्या स्वभावातून देखील अनेक माणसे जोडली. त्यामुळेच दैनिक ‘तऊण भारत’मध्ये गुऊवारी त्यांच्या निधनाचे वृत्त प्रकाशित झाले आणि राज्यात शोककळा पसरली. महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांमध्ये देखील त्यांच्या निधनाचे वृत्त पोहचले नव्हते सकाळी हे वृत्त सर्वत्र पसरले. गोव्यातील अनेक कलाकारांनी पंडित प्रभाकर कारेकर यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. संगीत क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले अशा शब्दात अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली. त्याचबरोबर एका चांगल्या मित्राला देखील आपण मुकलो अशा शब्दातही अनेकांनी आपली श्रद्धांजली वाहिली.









