रत्नागिरी :
पांडुरंगाच्या भेटीसाठी अनेक वारकरी आषाढी वारीत पायी दिंडीने पंढरपुरात जातात. त्याच भक्तिभावातून सायकलप्रेमीही महाराष्ट्रातील आपल्या सायकलवारीने हा प्रवास पूर्ण करतात. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने यंदा प्रथमच रत्नागिरी ते पंढरपूर या सायकलवारीचे आयोजन केले आहे. २० ते २२ जून या दरम्यान ही वारी होणार असून यात दहा जण ३०० किमीचे अंतर पार करणार आहेत.
पंढरपूरला सायकल वारी पोहोचल्यानंतर सकाळी सहा वाजता नगर प्रदक्षिणा केली जाते. नंतर नाश्ता दिला जातो. त्यानंतर वर्षभरात राबवलेले उपक्रम असतील त्यावर चर्चा होते. विशेष कार्य करणाऱ्या क्लबचा सत्कार केला जातो. प्रत्येक सायकल क्लबला सन्मानपत्र दिले जाते. जेवणानंतर सायकलवारीची सांगता होते. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत, विशाल भोसले, गजानन भाताडे, नारायण पाटोळे, अमित पोटफोडे, राकेश होरंबे, विकास कांबळे, अक्षय पोटफोडे, आरती दामले, अनुप मेंहदळे, ओंकार फडके, दर्शन जाधव हे वारीमध्ये सहभागी होणार आहेत.
- वारीसाठी मार्ग
रत्नागिरीतील माळनाका येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन २० जून रोजी पहाटे ५.३० वाजता सायकलवारीला सुरवात होणार आहे. हातखंबा, पाली, साखरपा, मलकापूर, कोकरूड, शेडगेवाडी, कराडमार्गे उंब्रज येथे पहिला मुक्काम होईल. २१ जूनला उंब्रज येथून पुढच्या प्रवासाला सुरवात होईल. त्यानंतर मसूर, पुसेसावळी, मायणी, दिर्घजी, महूद, पंढरपूर पंढरपूर मुक्काम. २२ जूनला भागवत एकादशी असून पहाटे ५.४५ वाजता नगर प्रदक्षिणा, त्यानंतर राज्यभरातील सायकलस्वारांचे रिंगण होईल. सायकल संमेलन, सत्कार, महाप्रसाद होऊन परतीचा प्रवास सुरू होईल.








