माशेल येथून पायी वारी निघाली
माशेल : पंढरीची आस…जीवा लागे ध्यास…! या आतुरतेनेच दरवर्षी वारकरी पंढरीच्या वारीची वाट पाहत असपतात. गेल्या काही वर्षांपासून पंढरीची पायी वारी करणाऱ्या माशेल येथील देवकीकृष्ण वारकरी मंडळाच्या वारकऱ्यांनी पांडुरंगाच्या भेटीची ही आस मनी धरीत रविवारी वारीला प्रस्थान केले. यंदा तीस वारकरी या पायी वारीत सहभागी झाले असून विठ्ठल नामाचा गजर करीत तब्बल 350 किलो मिटर अंतराचा पल्ला गाठीत ते पंढरपूर गाठणार आहेत. 24 जून रोजी ते पंढरपूरला पोचतील व 29 रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन गोव्याला परतणार आहेत. वारीदरम्यान दोडामार्ग, वीजघर, तिळारी, म्हाळेवाडी, कवळीकुट्टी, मैनापूर, शिरगुप्पी, भौसे, केरीवाडी, सांगोल्डा या ठिकाणी त्यांचा मुक्कम असेल. माजीमंत्री व मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिकांनी वारकऱ्यांना निरोप दिला. ‘तुका म्हणे माझे हेची सर्वसुख, पाहीन श्रीमुख आवडीने’ संत तुकाराम महाराजांच्या या आनंदाचा अुभव घ्यायचा असेल तरी पंढरीची वारी किमान एकदा तरी करावी असे दीपक ढवळीकर म्हणाले. गेली दहा ते बारा वर्षे आपण वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहत आहे व आनंदही मोठा आहे. यावेळी गुऊदास शेट नार्वेकर, भोम अडकोण पंचायतीचे सरपंच दामोदर नाईक, मिलिंद तिंबले, दामू दिवकर, संजय नावेलकर, जयेश शेट गोवेकर, भगवान धुरी, सर्वेश फुलारी व अन्य वारकरी उपस्थित होते. सर्व वारकऱ्यांनी श्री देवकीकृष्ण मंदिरात श्रींचे दर्शन घेऊन गाऱ्हाणे घातले., दीपक ढवळीकर यांच्याहस्ते देवकीकृष्ण मैदानावर श्रीफळ वाढवून वारीला रितसर प्रारंभ करण्यात आला.









