लेस्टर डिसोजा उपाध्यक्षपदी : खजिनदारपदी एस. एस. नरगोडी यांची निवड
बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेची वार्षिक सर्वसाधारणा सभा मोठ्या उत्साहात पार पडली असून सलग चौथ्यांदा पंढरी परब यांची अध्यक्षपदी, अमित पाटील यांची सचिवपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभेचे अध्यक्ष राम हदगल होते. बगीच्या हॉटेल्सच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला पंढरी परब, गोपाळ खांडे, लेस्टर डिसोजा, व्हिक्टर परेरा, सुनील गोदवाणी, रवी चौगुले, अल्लाबक्ष बेपारी, एस. एस. नरगोडी, उमेश मजुकर, अरिहंत भल्ला आदी सभासद उपस्थित होते. प्रारंभी सचिव अमित पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून गतवर्षीचा आढावा सादर केला. खजिनदार रवी चौगुले यांनी वार्षिक जमा-खर्च सादर केला. त्याला सर्व सभासदांनी अनुमती दिली. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. अध्यक्षपदी पंढरी परब, उपाध्यक्षपदी गोपाळ खांडे व लेस्टर डिसोजा, सेक्रेटरीपदी अमित पाटील, खजिनदारपदी एस. एस. नरगोडी यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी सलग चौथ्यांदा निवड झालेले पंढरी परब म्हणाले, गेली चार वर्षे फुटबॉल स्पर्धा भरविण्यात आल्या नाहीत. कोरोनाच्या महामारीमुळे सरकारच्या आदेशामुळे दोन वर्षे फुटबॉल सामने भरविण्यात आले नाहीत. 2021-22 या कालावधीत महानगरपालिकेने मैदानाच्या भाड्यात भरमसाठ वाढ केल्याने स्पर्धा भरविणे कठीण झाले. त्यामुळे अनेक फुटबॉल शौकीन नाराज झाले. पण पुढील 2023-24 या फुटबॉलच्या हंगामात आंतरशालेय मुला-मुलींची आंतरमहाविद्यालयीन त्याचप्रमाणे वरिष्ठ साखळी व बाद पद्धतीची स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आंतरजिल्हा व 17 वर्षाखालील मुलींच्या खेलो इंडिया स्पर्धा बेळगावात भरविण्यात येणार आहेत. केएसएफएच्या आदेशानुसार विविध फुटबॉल स्पर्धा व निवड चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती पंढर परीब यांनी दिली. याला सर्व सभासदांनी अनुमोद दिले. आभार सचिव अमित पाटील यांनी मानले.









