मच्छे/वार्ताहर
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मच्छे येथील प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात उत्साहाने भाग घेतला होता. शाळेतील विद्यार्थ्यांना पायी दिंडीत विठ्ठल-रखुमाई, नामदेव, तुकाराम, राधा श्रीकृष्ण, वारकरी यांची वेशभूषा केली होती. गावातून टाळ मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. तसेच शाळेतील विद्यार्थी वारकऱ्यांच्या रूपात टाळांचा गजर करीत दिंडीत सहभागी झाले होते. मुली डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या. गावातील पालक, ग्रामस्थ या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. ठिकठिकाणी महिला आणि नागरिकांनी पालखीचे पूजन करून विठुरायाचे दर्शन घेतले. विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन, पाण्याची बचत आणि स्वच्छतेवर आधारित घोषवाक्यांनी जनजागृती केली. अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
दिंडीनंतर शाळेच्या सभागृहामध्ये हभप भुजंग कणबरकर यांनी संताचे विचार आणि आषाढी एकादशीनिमित्त आपले विचार मांडले. या कार्यक्रमाला शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष सुधीर हावळ, सदस्य मोहन वसुलकर, गजानन छपरे तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.









