तनिष्क नाईक मालिकावीर, सुशांत कडोलकरला सामनावीरचा बहुमान
बेळगाव : संतिबस्तावड येथील पंचमुखी हनुमान क्रिकेट क्लब आयोजित पंचमुखी चषक पावसाळी रबरबॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हिंडलगा संघाने कल्लेहोळ संघाचा 44 धावांनी पराभव करून पंचमुखी हनुमान चषक पटकाविला. तनिष्क नाईकला मालिकावीर, सुशांत कडोलकरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. संतिबस्तवाड पंचमुखी हनुमान मैदानावर घेण्यात आलेल्या रबरीबॉल क्रिकेट स्पर्धेत 16 संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात हिंडलगा संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकात 4 गडी बाद 64 धावा केल्या. त्यात सुशांत कोवाडकरने 3 षटकार, 2 चौकारांसह 30, तनिष्क नाईक 1 षटकार, 1 चौकारांसह 15, सुशांत कडोलकरने 2 चौकारांसह 10 धावा केल्या. कडोलीतर्फे ज्ञानेश होनगेकरने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना कडोली संघाने 4 षटकात 5 गडी बाद 64 धावा केल्या. त्यात आकाश कटांबळेने 2 चौकार, 2 षटकारासह 25, गजानन झेडमाळेने 2 चौकारांसह 15 धावा केल्या. हिंडलगातर्फे सुशांत कोवाडकर, तनिष्क नाईक, विशाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दोन्ही संघाच्या धावसंख्या समान झाल्याने स्पर्धेच्या नियमानुसार प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात येते त्यानुसार हिंडलगा संघाला विजयी घोषित करण्यात आले.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बिडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकात 3 गडी बाद 55 धावा केल्या. त्यात उमेश पाटीलने 1 षटकार, 2 चौकारांसह 20, हर्षद दफेदारने 2 चौकारांसह 15, मंजुनाथ पाटीलने 12 धावा केल्या. कल्लेहोळतर्फे श्रीने 2 तर उमेशने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना कल्लेहोळ संघाने 4 षटकात 3 गडी बाद 56 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात राम पाटीलने 12 चेंडूत 4 षटकार व 2 चौकारांसह 38 धावा तर उमेशने 10 धावा केल्या. बिडीतर्फे मंजुनाथने 1 गडी बाद केला.
अंतिम सामन्यात हिंडलगा संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 1 गडी बाद 111 धावा केल्या. त्यात सुशांत कडोलकरने 6 उत्तुंग षटकार व 2 चौकारांसह नाबाद 51 तर तनिष्क नाईके 5 उत्तुंग षटकार, 2 चौकारांसह नाबाद 45 धावा करत जोडीने दुसऱ्या गड्यासाठी नाबाद 91 धावांची भागीदारी केली. कल्लेहोळतर्फे श्रीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना कल्लेहोळ संघाने 5 षटकात 4 गडी बाद 77 धावा केल्या. त्यात राकेशने 3 षटकार, 2 चौकारांसह 30 तर उमेशने 2 चौकारांसह 15 धावा केल्या. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे उद्योजक प्रणय शेट्टी, राहुल मगदूम, केदारनाथ चौगुले, गजानन जैनोजी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या हिंडलगा संघाला आकर्षक चषक व 20 हजार रुपये रोख तर उपविजेत्या संघाला 10 हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर सुशांत कडोलकर (हिंडलगा), उत्कृष्ट फलंदाज आकाश कटांबळे (कडोली), उत्कृष्ट गोलंदाज उमेश (कल्लेहोळ) तर मालिकावीर तनिष्क नाईक यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून संतोष सुळगे-पाटील, अभिषेक देसाई व शुभम सावंत यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंचमुखी हनुमान स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









