2-डी आरक्षण अमान्य : मुख्यमंत्र्यांना 24 तासांची मुदत, 2-ए मध्ये समावेशाची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
राज्य सरकारने पंचमसाली समाजाला जाहीर केलेले 2-डी आरक्षण समाजाने नाकारले आहे. आपण 2-ए मध्ये समाजाचा समावेश करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री बोम्माई यांनी 24 तासांत आरक्षण देणार की नाही हे जाहीर करावे, नहून 13 जानेवारीपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा गुऊवारी देण्यात आला आहे.
येथील गांधी भवनमध्ये पंचमसाली समाजाची कार्यकारिणी बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कुडलसंगमचे जगद्गुऊ बसव जयमृत्यूंजय स्वामीजी, आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ, माजी आमदार विजयानंद काश्यप्पण्णावर आदींसह समाजाच्या प्रमुखांनी सरकारला इशारा दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना बसनगौडा पाटील-यत्नाळ म्हणाले, 2-डी आरक्षणाला आपला विरोध आहे. आम्ही सरकारला धमकी दिली नाही. सुवर्णविधानसौधला घेराव घातला असता तर ती धमकी ठरली असती. मुख्यमंत्र्यांनी आमची दिशाभूल केली आहे. आईची शपथ घेऊन 2-ए आरक्षण देण्याचे वचन त्यांनी दिले होते. मात्र हे वचन त्यांनी पाळले नाही, असेही त्यांनी सांगितले.
आपल्याच पक्षाच्या सरकारवर टीका करताना जर पंचमसाली समाजाला आरक्षण दिले नाही तर पक्षावर त्याचे विपरित परिणाम होणार आहेत. बसवराज बोम्माई यांना भाजपचे शेवटचे मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी पंचमसाली समाजाची फसवणूक केल्याची भावना समाजात बळावली आहे. आरक्षणासाठी कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचेही बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी सांगितले.
जगद्गुऊ जयमृत्यूंजय स्वामीजी म्हणाले, 2-डी आरक्षण समाजाने नाकारले आहे. आम्ही 2-ए मध्ये समाविष्ठ करण्याची मागणी केली होती. सरकारने जाहीर केलेल्या आरक्षणाविषयी स्पष्टता नाही. 24 तासांत आरक्षण देणार की नाही? हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. 12 जानेवारीच्या आत राज्यपत्रात नोंद करावी. नहून हावेरी येथील मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे धरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.









