बसवजयमृत्युंजय स्वामी यांची माहिती : पोलिसांवर कारवाईची मागणी
बेळगाव : पंचमसाली समाजाचा 2ए मध्ये समावेश करावा. यासाठी लढा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात या मागणीसाठी केलेल्या पंचमसाली आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. सरकारने हे आंदोलन मोडीत काढले होते. समाजाला राजकीय बळकटी देण्यासाठी 16 जानेवारीपासून ग्राम पंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हास्तरावर जनतेच्या दरबारात जाणार आहे, अशी माहिती कुडल संगम पिठाचे श्री बसवजयमृत्युंजय स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कित्येक वर्षांपासून लिंगायत समाजाला 2ए मध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी सुरू आहे. हा लढा आता अधिक तीव्र करण्यात आला असून क्रांती लढा म्हणून सुरू ठेवला जाणार आहे. पंचमसाली समाजाचा संघर्ष दडपण्यासाठीच पोलिसांनी आंदोलकांवर लाठी चार्ज केला आहे. या पोलिसांना तातडीने निलंबित करून समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी स्वामींनी केली आहे. 900 वर्षांचा इतिहास असलेल्या लिंगायत समाजाचा अवमान झाला आहे. शिवाय सरकारनेही हे आंदोलन असंविधानिक असल्याचा दावा करून मूलभूत हक्कावर गदा आणली आहे. समाजाला स्फूर्ती मिळावी यासाठी जनतेच्या दरबारात जाऊन न्याय मागितला जाणार आहे, असे स्वामीजी बोलताना म्हणाले.









