आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज : अनेकजण जखमी, राष्ट्रीय महामार्ग रोखला : 70 ते 80 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
बेळगाव : आरक्षणासाठी सुरू असलेले पंचमसाली समाजाचे आंदोलन मंगळवारी चिघळले. आंदोलकांनी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तसेच पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गही रोखला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. लाठीचार्ज केल्याने अनेक आंदोलक जखमी झाले. यामुळे बराच काळ राष्ट्रीय महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद करावा लागला. दरम्यान 70 ते 80 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पंचमसाली समाजाचे आरक्षणासाठी मागील अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. कुडलसंगम येथील बसवजय मृत्युंजय स्वामीजींच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सुवर्णविधानसौध परिसरात आंदोलन होणार होते. आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने पंचमसाली समाज बांधव उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून व्रुझर तसेच ट्रॅक्समधून शेकडो आंदोलक सुवर्णसौध परिसरात दाखल झाले.
हिरेबागेवाडी टोल नाक्यानजीक पोलिसांनी आंदोलकांची वाहने थांबविली. यामुळे येथूनच वादाची ठिणगी पडली. दुपारी 12 नंतर केंडसकोप्प येथील आंदोलनस्थळी आंदोलनाला सुरुवात झाली. परंतु आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले होते. बसवजय मृत्युंजय स्वामी आंदोलकांना शांत राहण्याचा सल्ला देत होते. आंदोलनाला महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ, माजी आमदार महेश कुमठळ्ळी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्यासह इतर मान्यवरांनी भेटी दिल्या.
दुपारी तीन नंतर आंदोलन चिघळले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याशिवाय माघारी फिरणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेत थेट महामार्ग गाठला. काही आंदोलकांनी सुवर्ण विधानसौधच्या लोखंडी कमानीवर चढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अनेकवेळा विनंती करून देखील आंदोलक सुवर्णसौधला घेराव घालण्यासाठी पुढे सरकू लागल्याने अखेर लाठीचार्ज करावा लागला. अचानक लाठीचार्ज झाल्याने अनेक वयोवृद्ध आंदोलक जखमी झाले. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. बिथरलेल्या आंदोलकांनी पोलिसांची वाहने तसेच पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये काही पोलीस देखील जखमी झाले. जखमी आंदोलकांना रुग्णवाहिकांमधून बेळगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग परिसरात आंदोलकांच्या चपलांचा खच पडला होता. या आंदोलनाचे पडसाद रात्री उशिरापर्यंत बेळगावमध्ये उमटले.
पोलीस बंदोबस्तात मुख्यमंत्र्यांचा ताफा रवाना
आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याची मागणी करून देखील मुख्यमंत्री चर्चेसाठी आले नसल्याने आंदोलन चिघळले. दुपारनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेंगळूर येथे रवाना होणार होते. यावेळी महामार्गावर कडक बंदोबस्त होता. पोलिसांच्या बंदोबस्तात मुख्यमंत्री सिद्धरामय्या व गृहमंत्री जी. परमेश्वर यांचा ताफा रवाना झाला आहे.









