सरकारने शब्द पाळला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
आरक्षणासाठी पंचमसाली समाजाने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी महात्मा गांधीभवन येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सरकारने दिलेल्या मुदतीत आरक्षण जाहीर केले नाही तर 22 डिसेंबर रोजी 25 लाख समाज बांधवांचे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी कुडलसंगम येथील जगद्गुरू श्री जयमृत्यूंजय स्वामीजींच्या उपस्थितीत समाजाची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी मंत्री ए. बी. पाटील, शशिकांत नाईक, डॉ. विश्वनाथ पाटील, गुंडू पाटील आदींसह वेगवेगळ्या जिह्यातून आलेले अध्यक्ष व कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्वामीजींनी आंदोलनाची रुपरेषा जाहीर केली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण देण्यासंबंधी 19 डिसेंबरची मुदत मागितली होती. मुख्यमंत्र्यांनी स्वत: दिलेल्या मुदतीत आरक्षण जाहीर करावे. ठरलेल्या वेळेत आरक्षण जाहीर झाले तर 22 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचे भव्य सत्कार करण्यात येणार आहे. नहून त्याच दिवशी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, असे स्वामीजींनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. सरकारने दिलेल्या वचनाची जाणिव करुन देण्यासाठी बेळगाव येथे बैठक घेण्यात आली आहे. सरकारने आता विलंब करू नये. 19 डिसेंबरच्या सायंकाळपर्यंत आम्ही प्रतीक्षा करणार आहोत. न हून त्याच दिवशी सौंदत्तीहून सुवर्णविधानसौधपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे, असे स्वामीजींनी सांगितले.









