अध्याय पहिला
भीष्मांची सिंहगर्जना आणि त्यांनी फुंकलेल्या शंखाचा आवाज हे जेव्हा एकत्र झाले तेव्हा त्याची तीव्रता त्रैलोक्याच्या कानठळ्या बसण्याएव्हढी होती. त्याक्षणी कौरव सैन्यात शंख, नगारे, ढोल, मृदंग आणि कर्णा ही सर्व रणवाद्ये एकदम वाजू लागली. इकडे पांडव सैन्यात महान् रथावर आरूढ होऊन आलेल्या श्रीकृष्ण व अर्जुन यांनीही आपले दिव्य शंख वाजवले. भक्ताविषयीच्या विलक्षण प्रेमापोटी तो सर्वशक्तिमान परमेश्वर, अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत होता. लढाईत भाग घेणार नाही असे म्हणणारा श्रीकृष्ण पांडवांच्याकडून शंख वाजवण्यात मात्र पुढे आहे. त्याने शंखनाद करून आपल्या प्रिय भक्ताची बाजू घेऊन त्याच्या रक्षणासाठी त्याच्या पाठीशी आहे हे उघड उघड जाहीर केले.
पुढील श्लोकात संजय म्हणाला, भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य शंख, अर्जुनाने देवदत्त व अचाट कर्मे करणाऱ्या भीमसेनाने पौंड्र नावाचा महान शंख वाजवला.
पांचजन्य हृषिकेशे देवदत्त धनंजये । पौंड्र तो फुंकिला भीमे महाशंख महाबळे ।। 15 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, संजयाने धृतराष्ट्राला असे सांगितले की, पांडवांच्याकडून सर्वप्रथम श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख सहजलीलेने वाजवला. त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणे घुमत राहिला. ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो, त्याप्रमाणे कृष्णाच्या शंखाच्या महानादाने कौरवांच्या सैन्याचा जिकडे तिकडे दुमदुमणारा वाद्यांचा कल्लोळ कोणीकडे लोपला ते कुणालाच समजले नाही.
नंतर अर्जुनाने अतिगंभीर आवाजात आपला देवदत्त नावाचा शंख वाजवला. ते दोन्ही अचाट आवाज जेव्हा एकत्र मिळाले तेव्हा सर्व ब्रह्मांडाचे चूर्ण होते की काय असे वाटू लागले. इतक्यात खवळलेल्या यमाप्रमाणे आवेश चढलेल्या भीमाने आपला पौंड्र नावाचा मोठा शंख वाजवला. त्याचा आवाज कल्पांताच्या वेळच्या मेघगर्जनेप्रमाणे मोठा आणि अतिगंभीर असा होता.
पुढील श्लोकात संजयाने सांगितले की, कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय, नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक शंख वाजवला.
तेंव्हा अनंतविजय धर्मराज युधिष्ठीरे । नकुले सहदेवे हि सुघोष मणि-पुष्पक ।। 16 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, संजय राजाला पुढील वृत्तांत सांगताना म्हणाला, श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीम हे आपापले शंख वाजवत असतानाच धर्मराजाने अनंतविजय नावाचा शंख वाजवला. नकुलाने सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक या नावाचे शंख वाजवले. त्या आवाजाने कालही गडबडून गेला.
पुढील श्लोकात संजय म्हणाला, महाधनुर्धर काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टधुम्न, विराट, शत्रुकडून कधीही पराजय न पावलेला सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र, महाबाहु अभिमन्यु इत्यादिकांनी, आपापले शंख वाजवले.
मग काश्य धनुर्धारी शिखंडी हि महा-रथी । विराट आणि सेनानी तसा अजित सात्यकी ।।17 ।। राजा द्रुपद सौभद्र द्रौपदीचे हि पुत्र ते । सर्वांनी फुंकिले शंख आपुले वेगवेगळे ।। 18 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, त्या युद्धभूमीवर द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि अनेक राजे होते. हा वीर्यशाली काशीराजा पहा. तेथे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यु, अजिंक्य सात्यकी, राजश्रेष्ठ धृष्टद्युम्न व शिखंडी विराटादिक मोठे मोठे राजे, जे महत्त्वाचे शूर सैनिक होते, त्यांनी सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजवण्यास आरंभ केला.








