Rahul Rekhawar News : पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.राधानगरी,कुंभी,तुळशी,कासारी धरणातून पाणी पंचगंगा नदीत येत असते.दरम्यान, राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.मात्र हे पाणी कोल्हापूर शहरापर्यंत यायला 15 तास लागतात. त्यामुळे पाऊस पडला नाही तर नदीची पाणी पातळी जास्तीत जास्त 44 फुटांपर्यंत जाऊ शकते.कोल्हापूर शहरामध्ये पाणी येते त्या ठिकणावरील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. चिखली,आंबेवाडी,आरे गावातील नागरिकांसाठी सर्व व्यवस्था केली आहे.नागरिकांच्या राहण्याची,जेवणाची,आरोग्याची व्यवस्था केलीय.जनावरांचा चारा,त्यांना बांधण्याची व्यवस्था केलीय.नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,सूचनांचे पालन करावे. घराच्या दारापर्यंत पाणी येण्याची वाट पाहू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.आज ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीबद्दल त्यांनी माहिती दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, काल 27 शाळा आणि आज कोल्हापूर शहरातील सर्व शाळांना सुट्टी दिलीय. मुलं शाळेत गेल्यानंतर पालक स्थलांतरित होण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे कोल्हापूर शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केलीय. इचलकरंजी शहर आणि शिरोळ तालुक्यात देखील नागरिकांना सतर्क केलं आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,सूचनांचे पालन करावे. घराच्या दारापर्यंत पाणी येण्याची वाट पाहू नये. कारण त्यानंतर स्थलांतर करण्यात अडचणी निर्माण होतात,असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, स्थलांतरीत केलेल्या नागरीकांची निवारागृहात महिला आणि पुरुष अशी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. घर सोडल्यानंतर पोलीस कर्मचारी घराचं संरक्षण करतील त्यामुळे नागरीकांनी घराची काळजी करू नये असाही दिलासा रेखावार यांनी दिला.
पूरस्थितीची कारणे विचारताना रेखावर म्हणाले, पूरस्थिती निर्माण होण्यासाठी केवळ नदीकाठावरील बांधकामांना जबाबदार धरता येणार नाही. पण या बांधकामामुळे काही परिणाम होत आहे का याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शन मागवलं आहे. नवीन रेस लाईन आणि ब्ल्यू लाईनमध्ये पालिकेने एकाही बांधकामाला आतापर्यत परवानगी दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले.