कोल्हापूर / संतोष पाटील :
गेली आठवडाभर जिल्ह्याला मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. जिह्यात एकूण पावसाळ्यात साधारणपणे 1800 मीमी पाऊस पडतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात 289 मीमी पाऊस पडला. यातील बहुतांश पाऊस हा धरण क्षेत्रातील आहे. पंचगंगा 20 फुटांवर गेल्याने 13 बंधारे पाण्याखाली गेले. पाऊस बंद होवून चार दिवस झाले तरी अध्याप काही बंधारे पाण्याखाली आहेत. याच अर्थ फुटांनी वाढलेली पंचगंगा इचांनी कमी होतेय. यंदा महापूर आला नाही तरी पाण्याचा संथ निचरा डोकेदूखी वाढवणारा ठरु शकतो. यावर आताच उपाययोजना करणे शक्य असेल तर कराव्या लागतील.
मुसळधार पाऊस आणि राधानगरी धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडून पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होवू शकते या जर–तरच्या निकषावर जिल्हा प्रशासनाने 2019 आणि 2021 च्या महापुरात 52 फुटापर्यंत पंचगंगा गेल्यावर पाणी आलेली सर्व ठिकाणी रिकामी करण्याचे नियोजन केले. महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सजग असल्याचे यातून दिसले. 2019च्या महापुरात 350 दुभती जनावरे तसेच प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, 2021 च्या महापुरात दोन फुटांनी म्हणजे सरासरी 55-56 फुट पाणी पातळी जादा असूनही प्रापंचिक तसेच जीवीत नुकसान टळले. याचा अर्थ कोल्हापूरकर महापुराच्या बाबतीत अधिक काळजी घेत आहेत.
यंदा मे महिन्यातच धरणक्षेत्रात चार–पाच दिवसात 289 मीमी पाऊस झाला. पाच–दहा किलोमिटरच्या परिघात की ठिकाणी हलका तर काही ठिकाणी ढगफुटी सदृष्य पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर शहरात एका बाजूला रस्ते कोरडे असतानाच दुस्रया टोकाला ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने जयंती नाला फेसाळून वाहत होता. राधानगरी आणि काळम्मावाडी धरणात जेमतेम पाणी आहे. कृष्णा नदीच्या पाण्याला फूग नाही. कोयना नदीतून विसर्ग नाही. अलमट्टी धरणाच्या पाणी फुगीचा तर प्रश्नच नाही. मात्र मुसळधारेमुळे सुमारे 13 बंधारे पाण्याखाली गेले. राजाराम बंध्रायाची पाणी पातळी 19.6 फुटांवर गेली. पाऊस थांबून चार दिवसानंतरही 16.6 फुटांवर राहिली. चार बंधारे पाण्याखाली होते. याचा अर्थ पाण्याचा निचरा होण्याचे प्रमाण अत्यंत संथ आहे.
पंचगंगा का थबकली याचा शास्त्राrय अर्थाने विचार करुन त्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. ठेकेदार जगवण्यासाठी नदीतील गाळ काढणे हाच एककलमी कार्यक्रम हाती घेणे चुकीचे ठरणार आहे. नदी काठावर असणारे भराव काढण्यासह पूरप्रणव क्षेत्रातील इमारतींचा जोता लेव्हल मध्ये वाढ करणे, जयंती नाल्यातील गाळ शंभर टक्के काढणे. शहरातील लहानमोठे 357 नाल्याचा पुन्हा नैसर्गिक प्रवाह कायम करणे आदी मुलभूत उपायोजना हाती घेण्याची गरज आहे.
- हे तर ‘ड्रेनेज कंजेक्शन‘
मनुष्यवस्तीच्या (शहर, गाव) वरच्या बाजूला जे नदीचे जलग्रहण क्षेत्र असते तिथे खूप पाऊस पडल्यामुळे नदीचा प्रवाह वाढतो आणि पाणी नदीच्या पात्रातून ओसंडून वस्तीत शिरते. या प्रक्रियेला पूर म्हणतात. आणि पाऊस दूर कुठे तरी वरच्या बाजूला नाही, तर वस्तीतच पडतो, पण हे पावसाचे पाणी वेळेत नदीपर्यंत पोहोचून त्याचा निचरा होत नाही, यामुळे वस्ती जलमय होते त्याला इंग्रजीत ‘ड्रेनेज कंजेक्शन‘ म्हणतात. मराठीत आपण त्याला ‘निचरा खोळंबा‘ म्हणतात. पंचगंगा नदीचे पाणी 2019 आणि 2021 ला कोल्हापुरातील नागरीवस्तीत शिरते तो पूर. आणि 2005 साली मुंबईत आणि 2009 ला चेन्नईतजे घडले, तो ‘निचरा खोळंबा‘. आता कोल्हापुरात पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अढथळा निर्माण झाल्याने निचरा खोळंबा होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
- टक्केवारी आणि ठेकेदार धार्जीण धोरण नको
पूरसवंधर्नासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने कोल्हापूर आणि सांगली जिह्यात 3200 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील सव्वापाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होत आहे. यापैशातून नदीतील गाळ काढणे, नाल्यांचे रुंदीकरण आणि पाणी वहन क्षमता वाढवण्यासारखी महवाची कामे केली जाणार आहेत. याकामेच शास्त्राrय पध्दतीने मोजमाप करणे अशक्य आहे. पूरसंवर्धनाची ही कामे छुपी आहेत. हे शहर आणि जिल्हा माझा आहे, महापुराचा फटका माझ्याच माणासांना बसणार आहे, ही प्रामाणिक भावना ठेवूनच काम होण्याची गरज आहे. अन्यथा पहिल्या पावसातच कोट्यावधी रुपये खर्चून केलेल्या रस्त्याची खडी वर येते. याचे कोणालाच सोयरसुतक वाटत नाही, पूरसंवर्धनाच्या निधी हा ठेकेदार आणि टक्केवारीची वाटणीसाठीच होता याची प्रचिती येवू नये. योग्य कामासाठी योग्य ठिकाणी निधी मार्गी लागण्याची गरज आहे.








