सध्या पंचगंगा स्मशानभूमीत पुढील पाच वर्षे पुरेल इतका लाकूडफाटा जमा झाला आहे.
By : बाळासाहेब उबाळे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या सर्व स्मशानभूमीत मृतदेह दहन करण्यासाठी शेणी आणि लाकडाचा वापर केला जातो. पंचगंगा स्मशानभूमीत सर्वाधिक अंत्यसंस्कार होतात. यामुळे इतर स्मशानभूमीपेक्षा शेणी आणि लाकडे पंचगंगा स्मशानभूमीत जास्त लागतात. सध्या पंचगंगा स्मशानभूमीत पुढील पाच वर्षे पुरेल इतका लाकूडफाटा जमा झाला आहे. यामुळे महापालिकेला लाकडे विकत घेण्याची गरज नाही.
कोल्हापूर महापालिकेकडून अंत्यसंस्काराची संपूर्ण सुविधा मोफत पुरवली जाते. शहराच्या कोणत्याही भागातून मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी महापालिकेची मोफत शववाहिका आहे. नातेवाईकांना केवळ कापूर, अगरबत्ती आणि हार आणावा लागतो. 400 ते 700 शेणी, 100 ते 150 किलो लाकडे आणि कापरावर संपूर्ण मृतदेहाची राख होते. महापालिकेच्या या सुविधेमुळे शहराला लागून असलेल्या काही गावातीलही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पंचगंगा स्मशानभूमीत आणले जातात.
वर्षभरात सुमारे 4 हजार मृतदेहावर अंत्यसंस्कार होतात. यासाठी वर्षाला 700 ते 800 टन लाकडे आणि 25 लाख शेणी लागतात. तर सुमारे 40 लाख रुपये खर्च येतो. विविध संस्था,संघटना,मंडळे आणि नागरिकांकडून शेणी दान केल्या जातात. यामुळे महापालिकेचा आर्थिक भार काहीसा हलका होतो. पण दहनासाठी शेणीचाच वापर अधिक होत असल्याने शेणी जास्त लागतात. यामुळे शेणी लवकर संपतात. यासाठी महापालिका शेणी विकत घेते. तर लाकडे घेण्याची गरज भासत नाही. महापालिकेकडे लाकडे जमा होण्याचे प्रमाण मोठे आहे. सध्या पंचगंगा स्मशानभूमीत पुढील पाच वर्षे पुरतील इतकी लाकडे आहेत.
मंगळवारी झालेल्या पावसामुळे शहरात जवळपास 50 मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. पडलेली ती झाडे तोडून त्याचे लहान ओंडके करुन स्मशानभूमीत आणली जातात. शहरातील सरकारी कार्यालयाच्या आवारातील झाडे काही कारणांमुळे तोडावी लागतात. ती झाडेही मनपाला दिली जातात. मात्र ती फोडण्यासाठीचा खर्च आहे. लाकडे फोडण्यासाठी निविदा काढली जाते.
पंचगंगा स्मशानभूमीत लाकडांचा ढीग
“गेल्या काही वर्षात शहरात वृक्ष पडण्याचे प्रमाणे वाढले आहे.वादळी वारे आणि पावसामुळे झाडे पडतात.पडलेली ही झाडे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून तोडली जातात.यानंतर ही लाकडे महापालिका पंचगंगा स्मशानभूमीत आणली जातात.तसेच वर्षभर झाडाच्या फांद्या तोडण्याची प्रक्रिया सुरु होते.फांद्याची लाकडेही स्मशानभूमीकडे येतात. यामुळे सद्या पंचगंगा स्मशानभूमीत लाकडांचा ढीग लागला आहे.”
– डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक, कोमनपा
- स्मशानभूमीत वर्षाला दहन केल्या जाणाऱ्या मृतदेहांची संख्या – 4 हजार
- एका मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य : लाकडे– 100 ते, 150 किलो, शेणी– 400 ते 700 नग,
- वर्षाला लागणारी लाकडे– 700 ते 800 टन, वर्षाला लागणाऱ्या शेणी– 25 लाख,
- मृतदेह अंत्यसंस्कारासाठी महापालिकेला येणारा खर्च वार्षिक– 40 लाख








