विनय नावलगट्टी यांची माहिती : हमी योजना अंमलबजावणी समितीची बैठक
बेळगाव : अन्नभाग्य, गृहलक्ष्मी, गृहज्योती, शक्ती, युवानिधी या राज्य सरकारच्या पंचहमी योजना योग्यरितीने अंमलबजावणीसाठी परिश्रम घ्यावेत. पंचहमी योजनेशी संबंधित खात्यांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी हमी योजना सदस्यांनी समन्वयाने कार्य करीत रहावे, असे पंचहमी योजना अंमलबजावणी समितीचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांनी सांगितले. जि. पं. सभागृहात शुक्रवार दि. 28 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय पंचहमी योजना अंमलबजावणी समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावर नावलगट्टी बोलत होते. ग्रामीण भागात नागरिक व लाभार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधावा, लाभार्थ्यांना काही समस्या असल्यास त्या त्वरित जाणून घेऊन सोडवाव्यात, असे ते म्हणाले.
जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे म्हणाले, सरकारमान्य रास्त धान्य दुकानातून ओटीपीद्वारे धान्य मिळविण्यास यापूर्वी अनुमती होती. मात्र ओटीपीचा दुरुपयोग होऊ लागल्याने सरकारने ओटीपीद्वारे धान्य मिळविण्यासाठी बायोमेट्रिक सक्तीचे केले आहे. बायोमेट्रिकची समस्या असलेल्यांना तेवढेच सध्या ओटीपीद्वारे धान्य वितरण होत आहे. युवा निधी योजना योग्यरितीने अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावरील महाविद्यालयांना हमी योजनेच्या सदस्यांनी पदवीधरांची माहिती मिळावी.
खानापूर तालुक्यातील काही सरकारमान्य रास्त दुकानातून धान्य वितरण व्यवस्थित होत नाही. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी खानापूर तालुका हमी योजना अंमलबजावणी समिती अध्यक्षांनी केली. पाच किलो तांदळाऐवजी पैसे देण्यात येत आहेत. डिसेंबर महिन्यात पैसे देण्यात आले. जानेवारी महिन्याचे मात्र अद्याप देण्यात आलेले नाहीत. फेब्रुवारी महिन्यापासून केंद्र आणि राज्य सरकारमार्फत प्रत्येकी पाच किलो तांदूळ देण्यात येत असल्याची माहिती आहार खात्याचे उपसंचालक मल्लिकार्जुन नायक यांनी दिली. जि. पं. चे साहाय्यक सचिव राहुल कांबळे, महिला बाल कल्याण खात्याचे उपसंचालक आर. नागराज यासह परिवहन, हेस्कॉमचे अधिकारी, हमी योजना अंमलबजावणी समितीचे सदस्य व अन्य खात्याचे कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.









