थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ पनामासिटी
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पनामा येथे स्वत:च्या अधिकृत कार्यक्रमांची सुरुवात पनामा सिटी येथे भारतीय सांस्कृतिक केंद्राला भेट देत केली, शिष्टमंडळाने येथील मंदिरात प्रार्थना केली आहे. थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पनामा संसदेला भेट देत सभागृह अध्यक्षांची भेट घेतली. पनामा असेंबली अध्यक्ष डाना कास्टानेडा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत थरूर यांनी आम्ही सर्व वेगवेगळी राजकीय पार्श्वभूमी आणि भारताच्या वेगवेगळ्या हिस्स्यांमधील आहोत, परंतु आम्ही राष्ट्रीय उद्देशात एकजूट आहोत, असे म्हटले आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकार या भयानक गुन्ह्याच्या गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई करतेय का हे पाहण्यासाठी आम्ही प्रतीक्षा केली होती. परंतु स्पष्ट स्वरुपात काहीच करण्यात न आल्याने 2 आठवड्यांनी 7 मे रोजी आम्ही पाकिस्तानातील दहशतवादी अ•dयांना लक्ष्य केले होते. आम्हाला युद्ध सुरू करण्यात कुठलीच रुची नव्हती, परंतु दहशतवाद्यांना दंड करणे आवश्यक असल्याचे आम्हाला वाटले, असे थरूर यांनी म्हटले आहे.
दहशतवादाला पराभूत करू
भारतीय शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर पनामा संसदेच्या अध्यक्षांनी भारताचे समर्थन करण्याची घोषणा केली. दहशतवाद विरोधात पनामा भारतासोबत उभा आहे आणि आम्ही एकत्र आलो तर दहशतवादाला पराभूत करू शकू, असे उद्गार डाना कास्टानेडा यांनी काढले आहेत.
ऑपरेशन सिंदूर होते आवश्यक
ऑपरेशन सिंदूर का आवश्यक होते हे आमच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. दहशतवाद्यांनी 26 महिलांना त्यांचे पती आणि त्यांच्या वैवाहिक जीवनापासून वंचित करत त्यांच्या कपाळावरील कुंकू मिटविले होते. याचमुळे दहशतवाद्यांना धड शिकविणे क्रमप्राप्त ठरले होते, असे थरूर यांनी म्हटले आहे.









