पणजी : पणजी महानगरपालिकेतर्फे रु. 120 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून त्यास मनपाच्या काल गुरुवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पणजीतील विविध विकासकामांसाठी 20 कोटी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी त्यावेळी दिली. हा अर्थसंकल्प वर्ष 2025-26 सालासाठी असून सध्या महसुलात मनपाची आर्थिक स्थिती चांगली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा वार्षिक अर्थसंकल्प जास्त आहे. वर्ष 2025-26 मध्ये मनपाला रु. 120 कोटांचा महसूल मिळण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे तर खर्च रु. 118 कोटीपर्यंत होण्याचा अंदाज आहे.
करंजाळे येथे मासळी बाजार, बालोद्यान, सांत ईनेज दफनभूमी तसेच अन्य ठिकाणाची विविध विकासकामे करण्यात येणार असून काही डागडुजी तसेच दुरुस्तीकामे देखील केली जाणार असल्याचे मोन्सेरात यांनी स्पष्ट केले. पणजी मनपाच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी योग्य ती जागा शोधण्याचे काम सुरू आहे. लोकांना सोयीची होईल अशी जागा शोधण्यात येईल, असे आश्वासन मोन्सेरात यांनी दिले. त्यामुळे नवीन इमारत बांधणीचे काम रखडले आहे. नवीन बांधकाम सुरू करण्यापूर्वी जुन्या इमारतींमधून कार्यालये इतर दस्तावेज इतर ठिकाणी हलवणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. पणजी मार्केटमधील भाडे करार प्रश्न गुंतागुंतीचा असून त्यातून तोडगा काढण्याचे काम चालू आहे. गाळेधारकांना मूळ कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असून भाडे करारातून पणजी मनपाला रु. 30 कोटीचा महसूल मिळणार आहे.









