प्रतिनिधी / पणजी
अटल सेतू बंद केल्यामुळे पर्वरीसह पणजीपर्यंतची वाहतूक कोंडी सुटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून अटल सेतू सुरू होईपर्यंत ही कोंडी सुटणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काल गुरूवारी पणजी शहरात येण्यासाठी असलेला रस्ता डांबरीकरणासाठी बंद करण्यात आल्यामुळे पणजीतील वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. उत्तर गोव्यातून पणजीत येणाऱ्या वाहनचालक पर्वरीपासून पणजीपर्यंत वाहतूक कोंडीत अडकले. मांडवी नदीवरील दोन्ही पुलांवरही या कोंडीचा प्रभाव दिसत असून वाहतूक पोलीस वाढवून देखील त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.
पणजीत नियमित व दरदिवशी येणारे दुचाकी, चारचाकी वाहनचालक या कोंडीमुळे वैतागले असून त्यात वेळेबरोबरच इंधनही वाया जात असल्याचे समोर आले आहे. त्यातल्या त्यात दुचाकीचालक कसेतरी वाट काढून पुढे जातात परंतु चारचाकी वाहनांना मात्र कोंडींत अडकून पडावे लागत आहे.
अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असली तरी त्यांच्यामुळे वाहतूक कोंडी होत नाही तर दुचाकी, चारचाकी व इतर वाहने पणजीच्या दिशेने वाढल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. वास्को-मडगाव व दक्षिण गोव्यात जाणारी वाहने अटल सेतूवरून बाहेरच्याबाहेर सुटत होती. मात्र आता हा सेतू बंद असल्याने त्यांना पणजीतून जाण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे सदर कोंडीची डोकेदुखी उद्भवली आहे.
राजधानी पणजीत स्मार्ट सिटीची कामे, जी-20 बैठकीसाठीची कामे, डांबरीकरणाची कामे हे सर्व एकाच वेळी चालू असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच डांबरीकरणासाठी काही रस्ते बंद करून वाहतूक वळवण्यात येत असल्याने कोंडीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
वाहन चालकाकडे या प्रकरणी गप्प बसण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही. वाहतूक खात्याला या कोंडीचे काहीच सोयरसुतक नसून जी-20 परिषद बैठका महत्त्वाच्या वाटतात आणि त्यासाठी सामान्य जनतेला वेठीस धरून अटल सेतू , डांबरीकरण व इतर कामे चालू करण्यात आली आहेत. आणखी तीन-चार दिवस तरी म्हणजे अटल सेतू सुरू होईपर्यंत कोंडीची कटकट वाहनचालकांना भोगावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.









