पलूस / प्रतिनिधी
पलूसच्या आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेते व शेतकरी, व्यापारी यांच्यावर काही महिलांकडून अन्यायकारक खंडणी वसुल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलांना काही विरोध केला तर त्यांच्याकडून व्यापाऱ्यांना आणि शेतकरी महिलांना शिवीगाळ आणि मारहाण केली जाते असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
एखाद्या हिंदी चित्रपटातील दृश्यास लाजवेल, असा खंडणीचा प्रकार घडत असल्याचा व्हिडीओ सोशलमीडीयावर व्हायरल झाला आहे. पलूसला शनिवार व मंगळवार या दिवशी मोठा आठवडी बाजार भरतो. बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. बाजारात खरेदी व विक्रीसाठी पलूस शहरासह आजूबाजूच्या खेडेगावातून नागरिक महिलावर्ग येत असतो. बाजारात इतर चोऱ्या माऱ्याही होत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच काबाड कष्ट करून डोक्यावरून भाजीपाला विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांचा आणि छोट्य़ा व्यापाऱ्यांचा माल अशा खंडणीबहाद्दूर लोकांकडून वसूल केला जात आहे. या महिलांचा त्रास खुपच होत असल्याने त्यांची संतप्त भावना व्यापारी वर्ग आणि स्थानिकांकडून होत आहे.








