8 लाख 34 हजार मेट्रीक टनाची आयात : तेलाच्या किमती कमी होण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये पाम तेलाच्या आयातीमध्ये सप्टेंबर महिन्यात 26 टक्के इतकी घसरण झाली आहे. जागतिक बाजारामध्ये किमती कमी झाल्यामुळे पाम तेलाच्या आयातीत घट झाल्याचे कारण सांगितले जात आहे.
जगातील सर्वाधिक पाम तेलाची आयात भारत देश करतो. मात्र सप्टेंबर महिन्यामध्ये भारताने पाम तेलाच्या आयातीत घट नोंदवली आहे. तेल उत्पादकांकडून तेलाचा साठा केला जात आहे. ज्यामुळे जागतिक बाजारामध्ये किमती कमी होण्यास मदत झाली आहे. तेलाच्या वापरापासून तयार केलेल्या उत्पादनांच्या किमतीमध्ये सुद्धा कपात पाहायला मिळते आहे. काही प्रमाणात तेलाच्या किमती कमी झाल्याचेही दिसून आले आहे.
याचदरम्यान सप्टेंबरमध्ये 26 टक्के घसरणीसह भारताने विदेशातून 8,34,797 मेट्रिक टन इतक्या पामतेलाची आयात केली आहे. गेल्या तीन महिन्याच्या तुलनेमध्ये पाहता सप्टेंबरमधील आयात सर्वात कमी दिसून आली. इंडोनेशिया आणि मलेशियामधून पाम तेलाची मोठ्या प्रमाणात भारत आयात करतो. सोया तेलाची आयातदेखील घटून 3,58,557 टन इतकी झाली आहे तर सूर्यफुलाच्या तेलाची आयातसुद्धा 17 टक्के कमी होऊन 3,00,732 टन इतकी आयात राहिली होती.









