उत्पादन वाढीसाठी प्रयत्न : खात्यातर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहन
बेळगाव : तेल उत्पादनात वाढ व्हावी आणि याद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी पामतेल लागवडीवर भर दिला जात आहे. बागायत खात्यामार्फत कित्तूर तालुक्यातील हुन्शीकट्टी गावामध्ये पामची लागवड करण्यात आली आहे. बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमती स्थिर राहाव्यात आणि खाद्यतेल उत्पादन वाढावे, यासाठी बागायत खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. अलीकडे पामतेल लागवड वाढू लागली आहे. विशेषत: कित्तूर, अथणी, रायबाग, कुडची परिसरात लागवड होत आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पामची झाडे दिली जात आहेत. कित्तूर येथे पाम लागवडीदरम्यान सर्वाधिक उत्पादन घेतलेल्या पाम उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.









