बैलगाड्यांसह भक्तांचे प्रयाण : दवणा यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर पोहोचणार
बेळगाव : वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थानचे भक्त बेळगाव जिल्ह्याबरोबरच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. बेळगाव शहर व ग्रामीण भागातून अनेक सासनकाठ्या दवणा पौर्णिमा यात्रेसाठी दरवर्षी रवाना होतात. यावर्षीही सोमवारी नार्वेकर गल्ली येथील पालखी व चव्हाट गल्ली येथील सासनकाठी बैलगाड्यांसह वाजत गाजत रवाना झाल्या. यावेळी जोतिबाच्या नावानं चांगभलं म्हणून भक्तांनी जयघोष करत प्रयाण केले. श्री ज्योतिर्लिंग देवस्थान वाडी रत्नागिरी, कोल्हापूर येथे दवणा पौर्णिमा दि. 4 एप्रिल रोजी होणार आहे. व दि. 5 रोजी रात्री पालखी सोहळा होणार आहे. सालाबादप्रमाणे नार्वेकर गल्ली व चव्हाट गल्ली बेळगाव येथून पायी जाणारे भक्त पालखी, सासनकाठी व बैलगाड्यांसह कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. यावेळी वाजत गाजत या बैलगाड्या व सासनकाठी जाताना सुहासिनींनी पाणी ओतून आरती ओवाळली. मोठ्या भक्तिभावाने पालखी व सासनकाठीची पूजाअर्चा केली. या मिरवणुकीमध्ये ढोल, ताशे सहाभागी झाले होते. गुलालाची उधळण करण्यात आली. बैलांनादेखील सजविण्यात आले होते. जोतिबाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करत गोंधळी गल्लीतून ही भक्तमंडळी कोल्हापूरकडे निघाली आहेत. नार्वेकर गल्ली येथील पालखी बेळगावहून संकेश्वर, निपाणी, कागल, कोल्हापूर येथे वस्ती करणार आहेत. त्यानंतर दि. 1 एप्रिल रोजी जोतिबा डोंगरावर पोहोचणार आहेत. दवणा व पालखी सोहळा करून दि. 10 रोजी कोल्हापूर सर्कल बेळगाव येथे आंबिल व घुगऱ्यांची यात्रा करून पालखी नार्वेकर गल्ली येथे परत येणार आहे.









