सोहळ्यातील एक नंबरच्या दिंडीमध्ये वासकर महाराजांचा मोठा मान
Vari Pandharichi 2025: माउलींच्या पालखी सोहळ्यामध्ये विविध मानकरी आहेत. ज्या हैबतबाबांनी पालखी सोहळा सुरू केला, त्यांचे वंशज–प्रतिनिधी आहेत. त्यांना आदराने मालक असे संबोधले जाते. त्यांचा मान असतो. चोपदार यांचादेखील वंशपरंपरागत सेवेचा मान आहे. देवाला चवरी ढाळण्याचा मानदेखील आळंदीतील कुऱ्हाडे कुटुंबाला आहे. नंतर अब्दागिरी वाहण्याचा मान मुरूम आळीला आहे.
बैलांचा मानही आळंदीकरांना आहे. सोहळ्यातील एक नंबरच्या दिंडीमध्ये वासकर महाराजांचा देखील मोठा मान आहे. देवाचा तंबू, नैवेद्याची व्यवस्था, जरीपटका, दोन अश्व ही सर्व व्यवस्था शितोळे सरकारांकडे असते. त्यांचा देखील त्या पद्धतीने मान आहे. त्यानंतर पालखीला खांदेकरी असतात, कर्णेकरी असतात. ते आपापली सेवा आपआपल्या पद्धतीने, वंशपरंपरेने बजावत असतात.
पायी वारीची परंपरा
ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया।। तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।
असा अभंग संत बहिणाबाई यांनी लिहून ठेवला आहे. त्यात सर्व संतांच्या योगदानाचा उल्लेख आहे. तुकोबारायांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव नारायण महाराजांनी संतांच्या पादुका पालखीत घालून नेण्याचा प्रघात सुरू केला. ते तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन आळंदीला येत असत.
सोबत ज्ञानेश्वर माउलीच्या पादुका घेऊन एकत्रित सोहळा स्वरूपात जाण्याची पंरपरा त्यांनी सुरू केली. पायी वारीची परंपरा ही त्या अगोदरपासूनची आहे. पायी वारीला सोहळ्याचे स्वरूप नारायण महाराजांनी दिले. नारायण महाराजांच्या पश्चात पुन्हा हैबतबाबांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार आजच्या सोहळ्याचे स्वरूप दिसून येते.
इतर राज्यातील दिंड्या :
महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राच्या बाहेरूनही अनेक वारकरी, दिंड्या आषाढी वारीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येतात. कर्नाटक, आंध्रप्रदेश, चेन्नई, गोवा, गुजरात या राज्यांतून वारकरी येत आहेत. अलिकडच्या काळात पानिपतच्या युद्धादरम्यान जे आपले मराठा बांधव त्या ठिकाणी स्थायिक झाले, त्यांचे वशंजही आता वारीत सहभागी होण्यासाठी येतात.








