सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी कर्नाटक-महाराष्ट्रातील हजारो भाविक दाखल
वार्ताहर /सांबरा
श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथे श्री पंतनामाच्या अखंड गजरात मंगळवारी श्री पंत महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भाविक उपस्थित होते. त्यामुळे अवघी पंत बाळेकुंद्री श्रीपंत नामाने दुमदुमली. मंगळवार दि. 31 रोजी पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस होता. मंगळवारी पहाटे पाच वाजता पुण्यस्मरण कार्यक्रम झाला. त्यानंतर सकाळी सात वाजता श्रींची पालखी गावातील श्रींच्या वाड्यातून समारंभाने निघाली. या पालखी मिरवणुकीत भक्तांकडून श्री पंतांची पदे गात टिपरी व फुगड्या खेळण्यात येत होत्या. तर भजनसेवाही सुरू होती. पंतनामाचा अखंड गजर करत पंतभक्त तल्लीन होऊन नाचत होते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्तांनी गर्दी केली होती.
पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पालखी मिरवणुकीत कोल्हापूर, गडहिंग्लज, इचलकरंजी, गारगोटी, भुदरगड, पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातील भक्त उपस्थित होते. त्यानंतर दुपारी पालखी आमराईतील श्रीपंत स्थानी पोहोचली. दुपारनंतर परगावचे भाविक श्रीपंत बाळेकुंद्रीत दाखल होऊ लागले. त्यामुळे भाविकांच्या गर्दीत वाढ दिसून आली. रात्री आठ वाजता पालखीसेवेला प्रारंभ झाला. पालखीसेवेमध्ये सहभागी होण्यासाठी स्थानिक भक्तांसह परगावचे भक्तही मोठ्या संख्येने उपस्थित असतात. रात्री बारापर्यंत पालखीसेवा सुरू होती. त्यामुळे श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री भक्तांनी फुलून गेली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून पंतमंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी बरेच परिश्रम घेतले. तर राज्य परिवहन मंडळाच्या निरंतर बससेवेमुळे भाविकांची सोय झाली.
आज यात्रेची महाप्रसादाने सांगता
बुधवार दि. 1 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता महाप्रसाद होईल. दुपारी तीन ते पाचपर्यंत टिपरी कार्यक्रम होईल. तर सायंकाळी सहा वाजता श्रींची पालखी आमराईतील पूज्यस्थानी जाऊन गावातील वाड्यात पोहोचेल व उत्सवाची सांगता होईल.









