पुणे / प्रतिनिधी
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी ।
विठ्ठल तोंडी । उच्चारा ।।
अभंगाचा नाद…अन् टाळ-मृदंगाची साथसंगत…
अशा भारावलेल्या वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करीत संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत बुधवारी विसावला. तर संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरमध्ये मुक्कामाकरिता विसावली.
संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दोन दिवस पुण्यात मुक्काम होता. पुणेकरांच्या आदरातिथ्याने भारावलेला हा सोहळा आज सकाळी मार्गस्थ झाला. झपाझप पावले टाकत वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागले. हडपसर येथे दोन्ही पालख्यांचे मनोभावे स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली.
माउलींचा पालखी सोहळा निनादात व हरिनामाच्या गजरात अन हातात भगवे झेंडे घेत दिवेघाटाच्या दिशेने निघाला. वडकी येथे पालखीने दुपारचा विसावा घेतला. तेथे ग्रामस्थांतर्फे पालखीचे भक्तिभावात स्वागत झाले. त्यानंतर पालखी पुन्हा मार्गस्थ झाली. तोवर दिवे घाट जणू माउलींच्या स्वागतासाठीच सज्ज झालेला.दिवेघाटाचा टप्पा पार करताना वारकऱयांच्या अंगात बळ संचारले. दुपारी साडेचारच्या सुमारास वैष्णवांच्या मेळय़ाने घाटात प्रवेश केला. माउलींची पालखी थाटात दिवेघाटातून मार्गक्रमण करू लागली. तसा विठुनामाचा गजर टीपेला पोहोचला. रथ दौडू लागला. पालखीसवे वारकरीही धावू लागले, डोलू लागले. टाळ-मृदंगाचा, अभंगाचा निनाद डोंगरकपाऱयात घुमला. अवघा दिवे घाट विठुभक्तीत भिजून गेला. दिवेघाटाच्या परिसस्पर्शाने आत्मिक बळ प्राप्त झालेल्या वारकऱयांनी घाटाची ही अवघड चढण सहजगत्या पार केली. पाचला पालखी घाटमाथ्यावर पोहोचली. सायंकाळी माउलींची पालखी संत सोपान महाराजांच्या सासवडनगरीत विसावली. तेथे सासवडकरांनी पालखीचे भक्तिभावात स्वागत केले. सासवडकरांनी हा अनुपम सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.