छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा
बारामती : बारामती येथे सुरू असलेल्या 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक पुरुष विभागात पालघर, पुणे शहर, कोल्हापूर, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, मुंबई उपनगर व महिला विभागात ठाणे शहर, सांगली, पुणे शहर, पालघर आपआपल्या गटात विजय मिळविले. रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या वरिष्ठ पुरूष व महिला गट कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात पुरूषांच्या अ गटात पालघर संघाने अमरावती संघावर 53-32 असा विजय मिळविला. यानंतर झालेल्या ड गटातील लढतीत पुणे शहर संघाने सांगली संघावर 35-27 असा विजय मिळविला. ब गटात कोल्हापूर संघाने विदर्भातील तगड्या समजल्या जाणाऱ्या वाशिम संघाला 42-23 असे पराभूत केले. मध्यंतराला कोल्हापूर संघाकडे 19-15 अशी आघाडी होती. कोल्हापूरच्या ओमकार पाटील व साहिल पाटील यांना जोरदार चढाया करीत वाशिम संघाला सावरण्यास संधीच दिली नाही. याशिवाय, ब गटात अहमदनगर संघाने मुंबई शहर पश्चिम संघावर 47-24 असा दणदणीत विजय मिळविला. क गटात पिंपरी चिंचवड संघाने भंडारा संघावर 55-32 असा सहज विजय मिळविला तर ड गटात मुंबई उपनगर पूर्व संघाने यवतमाळला 48-32 असे नमवले.
महिला गटात ठाणे, सांगलीचा विजय
महिला विभागात, ब गटात ठाणे शहर संघाने अमरावती संघावर 58-16 असा एकतर्फी विजय मिळविला. ड गटात पुणे शहर संघाने नागपूर ग्रामीण संघावर 63-16 असा एकतर्फी विजय मिळवित आपली आगेकूच कायम ठेवली. याशिवाय, क गटात पालघर संघाने अकोला संघावर 66-20 असा सहज विजय मिळवित आपली घोडदौड सुरू ठेवली. अ गटात सांगली संघाने नागपूर शहर संघाचा 61-22 असा धुव्वा उडवला.









