71 वर्षीय घरमालकाने घेतला जीव
वृत्तसंस्था/ इलिनोइस
अमेरिकेच्या इलिनोइसमध्ये एका 71 वर्षीय इसमाने 6 वर्षीय पॅलेस्टिनी वंशाच्या मुलाची हत्या केली आहे. तुम्ही मरून जायला हवे असे म्हणत आरोपीने मुलावर चाकूने 26 वार केला होता. तसेच या मुलाच्या आईवरही त्याने हल्ला केला होता. हा हल्ला इस्रायल-हमास संघर्षामुळे करण्यात आल्याचे पोलिसांचे मानणे आहे.
दोन्ही पीडित मुस्लीम होते, त्यांना मध्यपूर्वेत होत असलेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामुळे लक्ष्य करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पीडित महिला आणि तिचा मुलगा आरोपी जोसेफ कजुबाच्या घरात भाडेतत्वावर राहत होते. जीव गमावलेला मुलगा पॅलेस्टिनी अमेरिकन होता. तर गंभीर जखमी झालेल्या त्याच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती शिकागोच्या कौन्सिल ऑन अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्सकडून देण्यात आली आहे.
आरोपी आणि महिलेदरम्यान झटापट झाली होती. याचदरम्यान महिलेने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली होती. यानंतर घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिसांना महिला आणि तिचा मुलगा बेडरुममध्ये आढळून आले. महिलेची प्रकृती गंभीर होती, तर मुलाच्या शरीरात हालचाल दिसून येत नव्हती. आम्ही दोघांनाही रुग्णालयात हलविले, तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
उत्तरीय तपासणीदरम्यान मुलाच्या शरीरातून मिलिट्री-स्टाइल नाइफ बाहेर काढण्यात आला आहे. याचे ब्लेड 7 इंचाचे होते. तर पोलिसांनी घटनास्थळावरूनच आरोपीला अटक केली आहे. आरोपीही जखमी असल्याने रुग्णालयात नेत त्याच्यावर उपचार करण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी द्वेषयुक्त गुन्ह्याची निंदा केली आहे. द्वेषयुक्त गुन्ह्यांना अमेरिकेत कुठलेच स्थान नसल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे.









