जहाल राष्ट्रवादी सरकारचे पहिले पाऊल ः इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष भडकण्याची भीती
वृत्तसंस्था / जेरूसलेम
इस्रायलच्या नव्या जहाल राष्ट्रवादी विचारसरणीच्या सरकारने एक आदेश जारी केला आहे, या आदेशामुळे इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष पुन्हा चिघळणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. इस्रायलच्या कुठल्याही हिस्स्यात पॅलेस्टाइनचा ध्वज फडकवू देऊ नका असे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री बेन गिविर यांनी पोलिसांना सांगितले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱयांना तुरुंगात टाकण्याचा निर्देशही त्यांनी दिला आहे.
बेंजामीन नेतान्याहू सरकारमध्ये गिविर यांना सर्वात कट्टरवादी मंत्री मानले जाते. त्यांनी अलिकडेच अल-अक्सा मशीद परिसराचा दौरा केला होता. त्यांच्या या दौऱयामुळे अरब जगताकडून संताप व्यक्त करण्यात आला होता.
इस्रायलच्या अनेक हिस्स्यांमध्ये अरब वंशीय लोक राहतात. अरबवंशीय लोकांचे प्रमाण अधिक असलेल्या भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी पॅलेस्टाइनचा ध्वज दिसून येतो. पॅलेस्टाइनचा ध्वज कुठल्याही स्थितीत दिसून येऊ नये. पॅलेस्टाइनच्या ध्वजामुळे ज्यूंच्या भावना दुखावल्या जातात तसेच कायदा-सुव्यवस्थेला धक्का पोहोचत आहे. पॅलेस्टाइनचा ध्वज फडकविल्यास त्याला दहशतवादी कृत्य मानले जाणार असल्याचे बेन गिविर यांनी पोलिसांना उद्देशून म्हटले आहे.
गिविर यांच्या या आदेशाला इस्रायलमध्ये राहणारे अरबवंशीय लोक विरोध करत आहेत. बहुतांश अरब इस्रायली नागरिक पॅलेस्टाइनचे समर्थन करत असल्याचे मानले जाते. याचमुळे अनेकदा इस्रायली आणि अरबवंशीय लोकांमध्ये वारंवार वाद देखील होत असतात.
मागील वर्षी मे महिन्यात ‘अल जझिरा’ वाहिनीची पत्रकार शिरीन अबु अक्लेहचा इस्रायली सैनिकांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. त्यानंतर इस्रायल तसेच गाझापट्टीत हिंसा झाली होती. त्यादरम्यान इस्रायली पोलीस आणि सैन्याने पॅलेस्टाइनचे सर्व झेंडे खाली उतरवून फाडून टाकले होते. इस्रायलमध्ये पॅलेस्टाइनचा ध्वज न फडकविण्याचा कायदा अद्याप नाही, परंतु कायदा-सुव्यवस्था बिघडत असल्यास हे ध्वज हटविता येणार असल्याचे नमूद आहे. अरब वंशीय लोक आणि पॅलेस्टिनी नागरिक घटनेतील याच त्रुटीचा लाभ घेत असल्याचे मानले जाते.

हिंसा भडकण्याची भीती
इस्रायलच्या मंत्र्याच्या नव्या आदेशानंतर पुन्हा एकदा इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे. इराणचे सरकार पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या मदतीने इस्रायलमध्ये हल्ले घडवून आणू शकते. इराणचे सैन्य पॅलेस्टाइनला शस्त्रास्त्रांच्या स्वरुपात मदत करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नेतान्याहू यांनी अरब देशांशी चांगले संबंध ठेवण्याची इच्छा आहे, परंतु इस्रायल कुठल्याही स्थितीत स्वतःची सुरक्षा आणि हितांबद्दल तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याचा अर्थ नेतान्याहू सरकार संघर्ष झाल्यास त्यासाठी तयार असल्याचे मानले जातेय. 2020 मध्ये देखील अशाच प्रकारच्या मुद्दय़ावरून इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात संघर्ष झाला होता आणि यात 38 लोक मारले गेले होते. मृतांमध्ये 7 इस्रायली नागरिकांचा समावेश होता









