निवडणूक आयोगाने दिली मंजुरी
वृत्तसंस्था/ चेन्नई
निवडणूक आयोगाने अण्णाद्रमुक महासचिव म्हणून एडप्पादी के. पलानिस्वामी यांच्या निवडीला मंजुरी दिली आहे. निवडणूक आयोगाने अनेक राजकीय पक्षांच्या संघटनात्मक निवडणुकींनंतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांची यादी अद्ययावत केली आहे. आयोगाने अण्णाद्रमुकच्या पदाधिकाऱ्यांची यादीही अपलोड केली आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयासोबत तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री पलानिसमी यांच्या अण्णाद्रमुकवरील नेतृत्वाच्या अधिकारावर मोहोर उमटली आहे. यापूर्वी 27 जून रोजी मद्रास उच्च न्यायालयाने अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते ओ. पन्नीरसेल्वम आणि त्यांच्या तीन समर्थकांकडून दाखल याचिकेवरील स्वत:चा निर्णय राखून ठेवला होता.
पन्नीरसेल्वम गटाने 28 मार्च रोजीच्या एकसदस्यीय खंडपीठाच्या आदेशाविरोधात दाद मागितली होती. अण्णाद्रमुकमधून पन्नीरसेल्वम यांची हकालपट्टी आणि 11 जुलै 2022 रोजी आयोजित अण्णाद्रमुकच्या सर्वसाधारण सभेत संमत प्रस्तावांप्रकरणी हस्तक्षेप करण्यास खंडपीठाने नकार दिला होता.









