वृत्तसंस्था/ ईस्ट लंडन
येथे सुरू असलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या पुरूषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ड गटातील सामन्यात सामनावीर शहाझइब खानच्या शानदार शतकाच्या जोरावर पाकिस्तानने अफगाणचा 181 धावांनी दणदणीत पराभव करत आपली विजयी सलामी दिली.
या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकने 50 षटकात 9 बाद 284 धावा जमवित अफगाणला विजयासाठी 285 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर पाकच्या भेदक गोलंदाजीसमोर अफगाणचा डाव 26.2 षटकात 103 धावात आटोपला.
पाकच्या डावामध्ये सलामीच्या शहाझेब खानने 126 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 106, कर्णधार साद बेगने 52 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 55, रियाझ उल्लाने 49 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 46, उबेद शहाने 12 चेंडूत 3 षटकारांसह 22, शमिल हुसेनने 2 चौकारांसह 17 आणि अहमद हुसेनने 1 चौकारासह 8 धावा केल्या. पाकच्या डावात 13 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे खलिल अहमदने 51 धावात 4, बशीर अहमदने 52 धावात 2 तर गझनाफर आणि नासिर खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणचा डाव 26.2 षटकात 103 धावात आटोपला. अफगाणच्या नौमन शहाने 31 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 26, हसन इसाखिलने 4 चौकारांसह 19, सोहेलखान झुर्मेतीने 2 चौकारांसह 20, रहिमतुल्ला झुर्मेतीने 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. अफगाणच्या डावात 1 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे उबेद शहाने 26 धावात 4, मोहम्मद झिशानने 17 धावात 3 तर अमीर हसन आणि अहमद हुसेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – पाकिस्तान 50 षटकात 9 बाद 284 (शहाझइब खान 106, साद बेग 55, रियाझ उल्ला 46, उबेद शहा 22, शमिल हुसेन 17, खलील अहमद 4-51, बशिर अहमद 2-52, गझनफर आणि नासिर खान प्रत्येकी 1 बळी), अफगाण 26.2 षटकात सर्व बाद 103 (नौवम शहा 26, सोहेलखान झुर्मेती 20, रहिमउल्ला झुर्मेती 20, हसन इसाखिल 19, अवांतर 9, उबेद शहा 4-26, मोहम्मद झिशान 3-17, अमीर हसन 1-24, अहमद हुसेन 1-16).









