लंकेचा चार गड्यांनी पराभव, इमाम उल हकचे अर्धशतक, जयसूर्याचे 4 बळी, सौद शकील सामनावीरचा मानकरी
वृत्तसंस्था /गॅले
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानने यजमान लंकेचा पहिल्या सामन्यात चार गड्यांनी पराभव करत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. गुरुवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी पाकने लंकेचा चार गड्यांनी पराभव केला. पाकच्या पहिल्या डावात नाबाद द्विशतक झळकवणाऱ्या सौद शकीलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात लंकेने पहिल्या डावात 312 धावा जमवल्यानंतर पाकने पहिल्या डावात 461 धावांचा डोंगर उभा केला. पाकने पहिल्या डावात 149 धावांची भक्कम आघाडी मिळवली. पाकच्या डावामध्ये सौद शकील नाबाद द्विशतक 208, आगा सलमानने 83 धावा झळकवल्या. लंकेच्या मेंडिसने 136 धावात 5 गडी तर प्रभात जयसुर्याने 3 गडी बाद केले. 149 धावांनी पिछाडीवर असलेल्या लंकेने दुसऱ्या डावात 279 धावापर्यंत मजल मारली. लंकेच्या दुसऱ्या डावात धनंजय डिसिल्वाने एकाकी लढत देत 2 षटकार आणि 10 चौकारासह 82 तर मधुष्काने 1 षटकार आणि 7 चौकारासह 52 तसेच रमेश मेंडिसने 1 षटकार आणि 3 चौकारासह 42 धावा जमवल्या. नौमन अली अब्रार अहमद यांनी प्रत्येकी 3 तर आगा सलमानने 2 गडी बाद केले. लंकेकडून पाकला निर्णायक विजयासाठी 131 धावांचे सोपे आव्हान मिळाले. पाकने 3 बाद 48 धावसंख्येवरून गुरुवारी खेळाच्या शेवटच्या दिवसाला पुढे प्रारंभ केला आणि उपाहारापूर्वीच त्यांनी 6 बाद 133 धावा जमवत हा सामना चार गड्यांनी जिंकला. पाकच्या दुसऱ्या डावात खेळाच्या चौथ्या दिवशी शफीक 8, शान मसूद 7 आणि नौमन अली 0 धावावर बाद झाले होते. इमाम उल हक आणि कर्णधार बाबर यांनी डावाला पुढे सुरुवात केली पण प्रभात जयसुर्याने बाबरला पायचित केले.
संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव 95.2 षटकात सर्व बाद 312, पाक प. डाव 121.2 षटकात सर्वबाद 461, लंका दु. डाव 83.1 षटकात सर्वबाद 279, पाक दु. डाव 32.5 षटकात 6 बाद 133 (अब्दुल्ला शफीक 8, इमाम उल हक नाबाद 50, शान मसुद 7, नौमन अली 0, बाबर 24, सौद शकील 30, सर्फराज अहमद 1, आगा सलमान नाबाद 6, अवांतर 7, प्रभात जयसुर्या 4-56, रमेश मेंडिस 1-62).









