वृत्तसंस्था /चेन्नई
पराभवाची हॅट्ट्रिक वाट्याला आल्याने कर्णधारपद धोक्यात आलेल्या बाबर आझमच्या पाकिस्तान संघाचा सामना आज मजबूत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना पाकिस्तानसाठी ‘जिंकू किंवा मरू’ स्थितीचा बनला आहे. पाकिस्तानला आणखी एक पराभव स्वीकारावा लागल्यास त्यांना बाद फेरीचे दरवाजे बंद होतील आणि बाबरला कदाचित कर्णधारपद गमवावे लागेल. कारण तशा स्थितीत त्याच्या संघाने उर्वरित तिन्ही सामने जिंकले, तरी विश्वचषकातील आव्हान शाबूत ठेवणे त्यांना जवळजवळ अशक्य आहे. . इथून पुढे पाकिस्तानने आपले सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. तसे झाले आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्या उर्वरित चार सामन्यांपैकी किमान दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला, तरच पाकिस्तानच्या आशा जिवंत राहतील. त्यादृष्टीने दक्षिण आफ्रिकेविऊद्ध जागतिक दर्जाची कामगिरी पाकिस्तानच्या हातून घडेल, अशी अपेक्षा बाबर बाळगून असेल. धर्मशाला येथे नेदरलँड्सविऊद्ध दक्षिण आफ्रिकेला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागूनही दोन्ही संघांच्या कामगिरीतील दरी मोठी आहे.
क्विंटन डी कॉक आणि हेन्रिक क्लासेन तसेच एडन मार्करमसारख्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी वेळेवर आवश्यक योगदान दिलेले आहे, तर पाकिस्तानच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनामुळे त्यांची स्थिती वाईट बनलेली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी 155 चौकार आणि 59 षटकार फटकावले आहेत, तर पाकिस्तानने पाच सामन्यांत 24 षटकार आणि 136 चौकार लगावले आहेत. यावरून दृष्टिकोनातील फरक स्पष्ट होतो. डी कॉक, क्लासेन, मार्करम, डेव्हिड मिलर, अष्टपैलू मार्को जॅनसेन या सर्वांचा स्ट्राइक रेट 100 पेक्षा जास्त राहिलेला आहे, तर पाकिस्तानच्या फक्त सौद शकील आणि इफ्तिकार अहमद या मधल्या फळीतील दोन फलंदाजांनी 100 स्ट्राइक रेट ओलांडला आहे. गोलंदाजीत शाहीन शाह आफ्रिदी सलामीच्या स्पेलमध्ये नेहमीप्रमाणे गोलंदाजी करू शकलेला नाही आणि हॅरिस रौफच्या प्रभावाविषयी देखील शंका निर्माण झाल्या आहेत. तथापि, चेपॉकवर पाकिस्तानची सर्वांत मोठी कमकुवत बाजू म्हणजे दर्जेदार फिरकीपटूंचा अभाव ही आहे. लेगस्पिनर उसामा मीरला खेळविणे त्यांच्या अंगावर उलटले आहे आणि शादाब खान हा तितकाच सामान्य दिसलेला आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डी कॉक फॉर्ममध्ये आहे. शिवाय त्यांचे वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा, जॅनसेन आणि गेराल्ड कोएत्झी यांचा सामना करणेही पाकिस्तानसाठी सोपे जाणार नाही. फिरकी गोलंदाज केशव महाराजने देखील मधल्या षटकांमध्ये सात बळी घेऊन प्रभाव दाखवला आहे.
संघ
पाकिस्तान-बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर झमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिकार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसिम.
दक्षिण आफ्रिका-टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेन्रिक क्लासेन, अँडीले फेहलुकवायो, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर डुसेन आणि लिझाद विल्यम्स.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा. प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, डिस्ने हॉटस्टार अॅप.









