पीसीबीचे संभाव्य अध्यक्ष झाका अश्रफ यांचा पाकमध्ये स्पर्धा आयोजन करण्याचा अट्टहास
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानने हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर या स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या होत्या. आशिया चषकाच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आता काही दिवसांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यू-टर्न घेतला आहे. दरम्यान, पीसीबीचे संभाव्य अध्यक्ष झाका अश्रफ यांनी एसीसीच्या हायब्रिड मॉडेलला फेटाळून लावले आहे. यामुळे आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी रात्री नजम सेठी यांनी पदभार सोडल्यानंतर नवे अध्यक्ष म्हणून अश्रफ यांचे नाव आघाडीवर आहे. नियोजित आशिया चषक स्पर्धा 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. यामध्ये 9 सामने श्रीलंकेत तर चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. तत्पूर्वी, भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर तत्कालीन पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी यावर तोडगा काढत हायब्रीड मॉडेलचा अवलंब केला होता. पण, आता नजम सेठी यांनी पीसीबीचे अध्यक्षपद सोडल्यानंतर झाका अश्रफ यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
दरम्यान, इस्लामाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या हायब्रीड मॉडेलला विरोध केला आहे. एसीसीने आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानला दिले होते आणि आम्हीच ही स्पर्धा आयोजित करु, असे त्यांचे म्हणणे आहे. हे हायब्रीड मॉडेल पाकिस्तानसाठी फायदेशीर नाही. यजमान असल्यामुळे संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानात खेळवली जावी यासाठी पाकिस्तानने अधिक चांगल्या प्रकारे बोलणी करायला हवी होती. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात सामने खेळवले जाणार आहेत आणि पाकमध्ये फक्त चार सामने खेळवले जाणार आहेत, जे आपल्या देशाच्या हिताचे नाही, असे ते म्हणाले. अद्याप मी पदभार स्वीकाराला नसल्याने याबाबत जास्त काही बोलणार नाही. पण, पदभार स्वीकारल्यानंतर कमी वेळात जे काही करता येईल, ते पाकिस्तानच्या भल्यासाठी असेल, असे ते यावेळी म्हणाले. दरम्यान, अश्रफ यांच्या वक्तव्यावर अद्याप बीसीसीआय किंवा एसीसीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अश्रफ या गोष्टीवर अडून बसले तर बीसीसीआय संपूर्ण स्पर्धा पाकिस्तान बाहेर घेण्याचा आग्रह करेल. पाकिस्तानकडे एक तर श्रीलंकेत खेळण्याचा किंवा स्पर्धेतून बाहेर पडण्याचा असे दोन पर्याय असतील. अश्रफ यांच्या भूमिकेमुळे आशिया चषक स्पर्धा पाकिस्तान शिवाय पाच देशांमध्ये खेळवावी लागेल, असे सध्याचे चित्र आहे.









