इराण ठाम राहिल्याने बदलला शाहबाज यांचा सूर : संयुक्त वक्तव्यात भारताचा उल्लेख करण्यास दिला नकार
वृत्तसंस्था/ तेहरान
मुस्लीमबहुल इराणने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे चार देशांच्या दौऱ्यादरम्यान इराणची राजधानी तेहरान येथे पोहोचले होते. परंतु शाहबाज शरीफ यांच्या दौऱ्यावरून इराणने जारी केलेल्या वक्तव्यात कुठेच भारताचा उल्लेख करण्यात आलेला नाही. हा एकप्रकारे पाकिस्तानसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. तेहरानमध्ये इराणचे राष्ट्रपती डॉ. मसूद पेजेशकियन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद सुरू असताना शाहबाज यांनी भारतासोबत पाणी, व्यापार आणि दहशतवाद विरोधी लढाईवर चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान इराणचे राष्ट्रपती पेजेशकियन यांनी इराणसाठी एक महत्त्वपूर्ण रणनीतिक शेजाऱ्याच्या स्वरुपात पाकिस्तानच्या महत्त्वावर प्रकाशझोत टाकला, दोन्ही देशांच्या सांस्कृतिक आणि संस्कृतीगत सह-अस्तित्वाच्या दीर्घ इतिहासाचा उल्लेख त्यांनी केला. परंतु सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे पत्रकार परिषदेत इराणकडून भारताचा उल्लेख न करणे ठरले आहे. यातून इराण आणि भारताचे संबंध किती मजबूत आहेत, हे स्पष्ट होते. यापूर्वी इराणने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची कठोर शब्दांत निंदा केली होती. तसेच संघर्षाच्या स्थितीदरम्यान इराणच्या विदेशमंत्र्यांनी पाकिस्तान आणि भारताचा दौरा केला होता.
राष्ट्रपती पेजेशकियन यांच्यानुसार इराण आणि पाकिस्तान विविध क्षेत्रीय, आंतरराष्ट्रीय आणि इस्लीम मुद्द्यांवर समान स्थिती राखून आहेत. तर दहशतवाद्यांचे अस्तित्व संपविण्याच्या महत्त्वावर पेजेशकियन यांनी जोर दिला आहे. इराण आणि पाकिस्तान दोन्ही देश सुरक्षा वाढविणे आणि सीमावर्ती क्षेत्रांमध्ये स्थिरतेला धोका पोहोचविणाऱ्या घटकांना सामोरे जाण्यासाठी प्रतिबद्ध आहेत असे म्हणत पेजेशकियन यांनी क्षेत्रात स्थायी सुरक्षा राखण्याच्या महत्त्वावरही वक्तव्य केले आहे. इराण पाकिस्तानी लोकांसाठी स्थिरता, कल्याण आणि शांततेचा पुरस्कार करतो. इराण सर्व शेजारी देशांसोबत सौहार्दपूर्ण संबंध इच्छितो आणि पश्चिम आशियाई तसेच दक्षिण आशियाई क्षेत्रांना पूर्वीच्या तुलनेत अधिक शांतता आणि सुरक्षेची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संयुक्त वक्तव्यात पॅलेस्टाइनचा उल्लेख करण्यात आला आहे, परंतु काश्मीर आणि भारताचा कुठलाही उल्लेख नाही. इराणने पाकिस्तानी पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान भारताच्या विरोधात कुठलेच वक्तव्य होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली आहे. तर दुसरीकडे शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत व्यापार आणि जलवाटपाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. परंतु याप्रकरणी भारताची भूमिका स्पष्ट आहे. भारताने पाकिस्तानसोबत केवळ दोन मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. पाकव्याप्त काश्मीरवरील कब्जा हटविणे आणि पाकिस्तानात सक्रीय दहशतवाद्यांना सोपविण्याच्या मुद्द्यावरच चर्चा होणार असल्याचे भारत सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.









