पॅलेस्टाईनची तुलना काश्मीरशी, भारताचे चोख प्रत्युत्तर
वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्रसंघ
इस्रायल आणि हमास यांच्यात चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने आयोजित केलेल्या विशेष बैठकीत पाकिस्तानने पुन्हा एकदा आपले गुण उधळल्याचे दिसून आले आहे. या बैठकीच्या प्रकट चर्चेत त्या देशाच्या प्रतिनिधीने दहशतवादाला स्पष्ट पाठिंबा दिला. तसेच पॅलेस्टाईनची तुलना काश्मीरशी करत आपले नेहमीचेच तुणतुणे वाजविले. मात्र, भारताने त्याला चोख प्रत्युत्तर देऊन जगाची सहानुभूती मिळविण्याचा त्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे.
पाकिस्तानचे प्रतिनिधी मुनिर अक्रम यांनी त्या देशाची भूमिका मांडली. पाकिस्तान सर्व प्रकारच्या आणि कोणत्याही कारणासाठी होत असलेल्या दहशतवादाचा निषेध करतो. तथापि, ज्या भागातील लोक विदेशी सत्ता झुगारुन देण्यासाठी आंदोलन करतात त्या संघर्षाला दहशतवाद म्हणता येणार नाही. असे संघर्ष आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंतर्गत मान्य करण्यात आलेले आहेत. पॅलेस्टाईन आणि काश्मीरच्या जनतेचा परकीय सत्तेविरोधातील संघर्ष याच प्रकारचा आहे. त्यामुळे हमास जे करीत आहे, त्याला दहशतवाद म्हणता येणार नाही, असे विधान त्यांनी केले. मात्र, हमासने इस्रायलच्या भूमीत शिरून जो नंगानाच केला आणि महिला आणि मुलांवर जे अत्याचार केले, त्याचा स्पष्ट निषेधही पाकिस्तानने केला नाही. तसेच अमेरिकेने दहशतवादाविरोधात जी ठाम भूमिका घेतली आहे, त्यामुळे अमेरिकेवरही टीका केली. परिणामी, पाकिस्तान दहशतवादाचे समर्थनच करतो हे स्पष्ट झाले. त्यामुळे पाकिस्तानचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.
भारताचे कठोर प्रत्युत्तर
भारताचे प्रतिनिधी आर. रविंद्रन यांनी पाकिस्तानचा नामोल्लेख टाळून पण चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून काश्मीरप्रश्नी नेहमीचेच तुणतुणे वाजविले आहे. पॅलेस्टाईन आणि काश्मीर यांची तुलना करणे हस्यास्पद असून केवळ अज्ञानाचे प्रदर्शन आहे. काश्मीर हा भारताचा अभिन्न भाग असून तो एक केंद्रशासित प्रदेश आहे. वास्तविक पाकिस्ताननेच काश्मीरच्या काही भागांत बेकायदेशीर घुसखोरी केली आहे. परिणामी, पाकिस्तानचे वक्तव्य पाकिस्तानलाच लागू होते, अशा अर्थाची खोचक टिप्पणी त्यांनी केली.
गुट्रेस यांचे वादग्रस्त विधान
या चर्चेचा प्रारंभ करताना राष्ट्रसंघाचे महासचिव अंटोनिओ गुट्रेस यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ उडाली आहे. हमासने इस्रायलवर केलेला हल्ला विनाकारण नाही, असे विधान त्यांनी केल्याने त्यांच्यावर दहशतवादाचे उघड समर्थन केल्याचा आरोप इस्रायलने केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुखपदी असलेल्या व्यक्तीने अशाप्रकारे दहशतवादाचे समर्थन करावे, ही बाब मानवतेला काळीमा फासणारी आहे. गुट्रेस यांनी या पदावर राहून त्याचा अवमान करु नये. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी इस्रायलने केली आहे.
हमास हल्ला, मुंबई हल्ला सारखेच
अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँथोनी ब्लिंकन यांनी चर्चेत दहशतवादाचा कडाडून निषेध केला. 7 ऑक्टोबरला हमासने केलेला मुंबईवरील हल्ला आणि पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने मुंबईवर 2008 मध्ये केलेला हल्ला हे सारखेच आहेत, असे स्पष्ट विधान करुन त्यांनी पाकिस्तानचे दात त्याच्याच घशात घातले. संयुक्त राष्ट्रसंघ आणि सुरक्षा परिषद यांनी नेहमीच कोणत्याही प्रकारच्या आणि कोणत्याही कारणासाठी चाललेल्या दहशतवादाचा कठोर निषेधच केलेला आहे, हे त्यांनी स्पष्टपणे जाणवून दिले.
भारताची पाकिस्तानवर टीका
ड दहशतवादाचे समर्थक देश जगाला शहाणपणा शिकवित असल्याचा आरोप
ड पॅलेस्टाईनची तुलना काश्मीरशी करणे हे पाकिस्तानचे हास्यास्पद अज्ञानच
ड काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग, पाकिस्तानचीच काही भागावर घुसखोरी









