वृत्तसंस्था / इस्लामाबाद
दोन वर्षांपूर्वी अमेरिकेने जेव्हा अफगाणिस्तानातून आपले सैन्य बाहेर काढले, तेव्हा जी शस्त्रास्त्रे अमेरिकेने या देशात सोडली होती, तीच आज तालिबानकडून पाकिस्तानच्या विरोधात उपयोगात आणण्यात येत आहेत, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानात गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. याला अफगाणिस्तानातील तालिबान सरकार जबाबदार आहे, असेही पकिस्तानचे म्हणणे आहे. मात्र, तालिबाच्या अस्थायी प्रशासनाने पाकिस्तानचा हा आरोप संपूर्णत: फेटाळला होता.
पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी हा आरोप बुधवारी केला. पाकिस्तानात येत्या फेब्रुवारीत संसदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ती आता जवळ आली असताना होणारे हे दहशतवादी हल्ले तेथील सर्व राजकीय पक्षांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान वायूदलाच्या एका तळावर पाकिस्तानातील तालिबान या दहशतवादी संघटनेने केलेल्या भीषण हल्ल्यात पाकिस्तानच्या 17 सैनिकांचा मृत्यू झाला होता. याच हल्ल्यात पाकिस्तानच्या वायुदलाची आठ विमाने जाळून निकामी करण्यात आली होती. त्यामुळे पाकिस्तानला आता सुरक्षेचा प्रश्न भेडसावू लागला आहे.
अमेरिकेचा मोठा शस्त्रसाठा
अफगाणिस्तानातून 2021 मध्ये अमेरिकेने आपली सेना बाहेर काढली. त्यानंतर तेथे तालिबानचे शासन आले आहे. अमेरिकेच्या सैनिक मायदेशी परतताना मोठा शस्त्रसाठा अफगाणिस्तानात सोडून गेले आहेत. या शस्त्रांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असून ती जगभरात होत आहे. तथापि, अनेक शस्त्रांचा उपयोग पाकिस्तानात हिंसाचार करण्यासाठी केला जात आहे. असे प्रतिपादन काकर यांनी केले. हा पाकिस्तानच्या दृष्टीने चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









