सामनावीर सईम अयुबचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ दुबई
यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 तिरंगी मालिकेत पाकिस्तानने सलग दुसरा सामना जिंकला. शनिवारी रात्री झालेल्या सामन्यत त्यांनी यूएईचा 31 धावांनी पराभव केला. यापूर्वी शुक्रवारी त्यांनी अफगाणिस्तानचा पराभव केला होता. या विजयात सर्वात मोठे योगदान सईम अयुब (69 धावा) आणि हसन नवाज (38 धावा) यांच्या वेगवान फलंदाजीचे होते. प्रथम फलंदाजी करताना पाकचा डाव 207 धावांत आटोपला. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना युएईला 176 धावापर्यंत मजल मारता आली.
नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार सलमान आगाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी, संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि सलामीवीर साहिबजादा फरहान लवकर परतला. यानंतर फखर जमाननेही फक्त 6 धावा काढून आपली विकेट गमावली. कर्णधार सलमान आगालाही 5 धावा करता आल्या. यानंतर मात्र सईम अयुबने शानदार खेळी साकारताना आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने फक्त 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि 38 चेंडूत 69 धावांची खेळी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. या डावात त्याने चार षटकार आणि सात चौकार मारले. दुसरीकडे, हसन नवाजने अयुबला साथ दिली. नवाजने फक्त 26 चेंडूत 56 धावा केल्या. नवाजने त्याच्या डावात 2 चौकार आणि 6 षटकार मारले. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 25 चेंडूत 57 धावांची भागीदारी झाली. ही जोडी बाद झाल्यानंतर तळाचे फलंदाज मोहम्मद नवाज (25 धावा), फहीम अश्रफ (16 धावा) आणि हसन अली (9 धावा) यांनी शेवटच्या चार षटकात 45 धावा जोडून धावसंख्या 207 पर्यंत नेली. इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे पाकचा डाव कोसळला.
विजयी आव्हानाचा पाठलाग करताना युएईकडून आसिफ खानने 35 चेंडूत 77 धावांची शानदार खेळी केली. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. कर्णधार मुहम्मद वसीमनेही 18 चेंडूत 33 धावांची जलद खेळी केली. इतर युएईच्या फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने त्यांना 8 गडी गमावत 176 धावापर्यंत मजल मारता आली. पाककडून हसन अलीने 3 तर मोहम्मद नवाजने दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान 20 षटकांत सर्वबाद 207 (सईम अयुब 69, हसन नवाज 56, फहीम अश्रफ 16, जुनेद सिद्दीक आणि सागीर खान प्रत्येकी तीन बळी)
युएई 20 षटकांत 8 बाद 176 (मोहम्मद वासीम 33, आसीफ खान 77, हसन अली 3 तर मोहम्मद नवाज 2 बळी).









